Who is Sanjay Malhotra? : आरबीआयचे नवे गव्हर्नर संजय मल्होत्रा भारतीय रिझर्व्ह बँकेचे नवे गव्हर्नर असतील. केंद्रीय मंत्रिमंडळाने सोमवारी नवे 26 वे गव्हर्नर म्हणून त्यांच्या नावाला मंजुरी दिली. ते विद्यमान गव्हर्नर शक्तीकांत दास यांची जागा घेतील. बुधवारी 11 डिसेंबर रोजी ते पदभार स्वीकारतील. त्यांची नियुक्ती 3 वर्षांसाठी आहे. सध्या ते महसूल सचिव पदावर कार्यरत आहेत. (RBI New Governor: मोठी बातमी! महसूल सचिव संजय मल्होत्रा यांची आरबीआयचे पुढील गव्हर्नर म्हणून नियुक्ती)
शक्तिकांता दास यांचा कार्यकाळ संपुष्टात
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील मंत्रिमंडळाच्या नियुक्ती समितीने संजय मल्होत्रा यांना पुढील तीन वर्षांसाठी आरबीआयचे गव्हर्नर बनवण्याच्या प्रस्तावाला मंजुरी दिली आहे. 11 डिसेंबर 2024 रोजी ते पदभार स्वीकारतील.विद्यमान गव्हर्नर डॉ. शक्तिकांत दास यांचा सहा वर्षांचा कार्यकाळ आज 10 डिसेंबर 2024 रोजी संपणार आहे. आरबीआयच्या इतिहासात डॉ. दास हे दुसरे सर्वात जास्त काळ गव्हर्नर म्हणून कार्यरत होते.
महसूल सचिव मल्होत्रा हे 1990 चे राजस्थान केडरचे आयएएस अधिकारी आहेत. आपल्या कारकिर्दीत त्यांनी ऊर्जा, माहिती तंत्रज्ञान आणि अर्थ यासारख्या महत्त्वाच्या मंत्रालयांमध्ये काम केले आहे. महसूल सचिव होण्यापूर्वी त्यांनी अर्थ मंत्रालयाच्या वित्तीय सेवा विभागातही काम केले होते. केंद्र आणि राज्य सरकारच्या आर्थिक स्थितीबाबत त्यांना काम करण्याचा व्यापक अनुभव आहे.
यूपीएससी परीक्षा उत्तीर्ण होण्यापूर्वी ते आयआयटी (कानपूर) मधून संगणक विज्ञान पदवीधर होते. आरबीआयच्या गव्हर्नर पदावर अर्थ मंत्रालयातील वरिष्ठ अधिकाऱ्याची नियुक्ती करण्याची परंपरा खूप जुनी आहे. विद्यमान गव्हर्नर डॉ. दास यांनी वित्त सचिव म्हणूनही काम केले होते. संजय मल्होत्रा सेंट्रल बँक ऑफ इंडियाच्या गव्हर्नरपदाची जबाबदारी अशा वेळी सांभाळणार आहेत. जेव्हा आरबीआयने महागाईवर अधिक लक्ष केंद्रित करायचे की मंदावलेल्या अर्थव्यवस्थेला गती द्यायची, असा प्रश्न आरबीआयसमोर निर्माण झाला आहे.