(प्रतिनिधिक छायाचित्र ) Photo credits Pixabay

उत्तर प्रदेशातील मऊमध्ये रविवारी सकाळी समाजवादी पार्टीचे नेते बिजली यादव (Samajwadi Party leader Bijli Yadav) यांची गोळ्या घालून हत्या (Murder) करण्यात आली. मोहम्मदाबाद परिसरात अज्ञात हल्लेखोरांनी बिजली यादव यांच्यावर गोळ्या झाडल्या. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे. हा हल्ला करण्यात आल्यानंतर हल्लेखोर घटनास्थळावरून फरार झाले.

बिजली यादव हे रविवारी सकाळी फिरायला निघाले होते. याचवेळी हल्लेखोरांनी बिजली यादव यांच्या डोक्यात गोळी झाडली. त्यामुळे बिजली यादव यांचा जागेवर मृत्यू झाला. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. (हेही वाचा - पुणे: 40 लाखांच्या खंडणीसाठी मित्राचे अपहरण करून हत्या; सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या आवरात सापडला मृतदेह)

अद्याप यादव यांच्या हत्येचे कारण समजू शकलेले नाही. पोलिस या घटनेचा अधिक तपास करत आहेत. यावर्षी उत्तर प्रदेशमधील पंचायत समितीच्या निवडणुका होणार आहेत. यादव हे या निवडणुकांची तयारी करत होते. त्यामुळे राजकीय शत्रुत्वातून त्यांची हत्या करण्यात आली असावी, असा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात येत आहे.