धक्कादायक! पालकांनी 5 हजाराचे कर्ज फेडले नाही म्हणून, अडीच वर्षाच्या मुलीची डोळे काढून अमानुष हत्या; कुत्र्यांनी कुरतडला मृतदेह
Image used for representational purpose | (Photo Credits: PTI)

उत्तर प्रदेशच्या (Uttar Pradesh) अलीगढमध्ये (Aligarh) अडीच वर्षांच्या मुलीचे डोळे काढून तिला मारहाण करून खून केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. टाइम्स नाऊने दिलेल्या वृत्तात आई वडील स्वतःवर असलेले 5 हजार रुपयांचे कर्ज फेडू न शकल्याने, ही हत्या झाली असल्याचे म्हटले आहे. या प्रकरणी दोन जणांना अटक करण्यात आली आहे. मुलीवर बलात्कार झाल्याचेही बोलले जात आहे, मात्र पोलिसांनी ही गोष्ट फेटाळून लावली आहे. या घटनेने राज्यात एकच खळबळ उडाली आहे.

आकाश कुलहारी (Akash Kulhari), एसएसपी अलीगढ यांनी एएनआयला दिलेल्या माहितीनुसार, ‘31 मे रोजी या मुलीचे अपहरण झाले असल्याची तक्रार नोंदवण्यात आली होती. त्यानंतर घडलेल्या तपासात स्थानिक रहिवाशांना तप्पल परिसरात, कुत्र्यांनी अर्धवट अवस्थेत कुरतडलेला मुलीचा मृतदेह आढळून आला होता. त्यानंतर पोलिसांकडून आरोपींना अटक करण्यात आली, व त्यांनी गुन्हादेखील कबूल केला आहे. ही घटना वैयक्तिक वादातून झाली असल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. सध्या आरोपी तुरुंगात आहेत.’ (हेही वाचा: क्रूरतेचा कळस: टीव्ही पाहते म्हणून आईने पोटच्या 5 वर्षाच्या मुलीची केली हत्या; बेल्टने मारून केले होते उन्हात उभे)

अपहरणाची तक्रार नोंदवल्यानंतर 5 दिवसांनी मुलीचा मृतदेह सापडला. मुलीच्या कुटुंबावर 5 हजार रुपयांचे कर्ज होते, ते फेडण्यास विलंब होत होता. याच कारणामुळे आरोपी आणि मुलीचे काका व आजोबा यांच्यात वाद झाले. या वादानंतरच मुलीचे अपहरण करून तिची अमानुष हत्या करण्यात आली.