Delhi Assembly Election 2025: 5 फेब्रुवारी 2025 रोजी होणाऱ्या दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या (Delhi Assembly Election 2025) पार्श्वभूमीवर, भारतीय जनता पक्षाने आपला जाहीरनामा (BJP Manifesto) सादर केला आहे, ज्यामध्ये राष्ट्रीय राजधानीतील लोकांसाठी कल्याणकारी उपाययोजनांचे आश्वासन देण्यात आले आहे. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांनी शुक्रवारी पक्षाच्या राज्य कार्यालयात हा जाहीरनामा जाहीर केला. महिला मतदारांना आकर्षित करण्यासाठी, भाजपने दिल्लीतील प्रत्येक महिलेला 2500 रुपये देण्याचे आश्वासन दिले आहे. महिलांना सक्षम बनवणे आणि त्यांच्या कल्याणासाठी आर्थिक मदत सुनिश्चित करणे हे या उपक्रमाचे उद्दिष्ट आहे.
एलपीजी सिलिंडरवर 500 रुपयांचे अनुदान -
तथापी, पक्षाने एलपीजी सिलिंडरवर 500 रुपयांचे अनुदान देण्याचेही आश्वासन दिले आहे, ज्यामुळे स्वयंपाकाच्या गॅसच्या वाढत्या किमतींचा सामना करणाऱ्या कुटुंबांना दिलासा मिळणार आहे. जाहीरनामा सादर केल्यानंतर जे पी नड्डा यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की, भाजप शहरातील विद्यमान कल्याणकारी योजना सुरू ठेवेल आणि रहिवाशांचे जीवनमान सुधारण्यासाठी नवीन उपक्रमांवर लक्ष केंद्रित करेल. भाजपचे शासन मॉडेल समाजातील सर्व घटकांच्या, विशेषतः उपेक्षित समुदायांच्या कल्याणावर केंद्रित राहील. (हेही वाचा -Delhi Assembly Election Schedule: दिल्ली विधानसभा निवडणूक वेळापत्रक;5 फेब्रुवारीला मतदान, 8 फेब्रुवारीला मतमोजणी, जाणून घ्या संपूर्ण तपशील)
सर्व चालू सार्वजनिक कल्याणकारी योजना सुरू राहतील -
भाजप सत्तेत आल्यास सर्व चालू असलेल्या सार्वजनिक कल्याणकारी योजना सुरू राहतील, अशी घोषणाही नड्डा यांनी केली. दिल्लीत सुरू असलेल्या सर्व योजना दिल्लीत भाजपच्या अंतर्गत सुरू राहतील. आप पक्ष ज्या भ्रष्टाचाराच्या क्षेत्रात भरभराटीला आहे, त्या सर्व क्षेत्रांना आम्ही नष्ट करू. आम्ही 2024 मध्ये 500 आश्वासने दिली होती, त्यातली 499 पूर्ण केली. 2019 मध्ये 235 आश्वासने दिली होती. त्यातली 225 पूर्ण केली. उर्वरितही अंमलबजावणीच्या टप्प्यावर आहेत, असेही नड्डा यांनी यावेळी सांगितलं. (Delhi Assembly Election 2025: भाजपने जाहीर केली उमेदवारांची पहिली यादी; Parvesh Verma अरविंद केजरीवाल विरोधात लढणार)
भाजपच्या जाहीरनाम्यातील प्रमुख आश्वासने -
- महिला समृद्धी योजनेअंतर्गत दिल्लीतील महिलांना 2,500 रुपये
- दिल्लीतील गरीब महिलांसाठी LPG सिलिंडरवर 500 रुपये अनुदान.
- प्रत्येक होळी आणि दिवाळीला 1 सिलिंडर
- महिलांसाठी 6 पोषण किट, गर्भवती मातांना 21000 रुपये दिले जातील.
दिल्लीतील मतदारांच्या अभिप्रायाच्या आधारे हा जाहीरनामा तयार करण्यात आला आहे. दिल्लीतील निवडणुक अधिक स्पर्धात्मक बनत आहे, आम आदमी पक्ष (आप), भाजप आणि काँग्रेस पक्ष सत्तेसाठी जोरदार सभांचे आजोयन करत आहेत. आप शहरात आपले वर्चस्व टिकवून ठेवण्याचा प्रयत्न करीत आहे, तर भाजप मतदारांच्या चिंता दूर करून आणि नवीन कल्याणकारी योजना देऊन मतदारांना आकर्षित करत आहे. दिल्लीत 5 फेब्रुवारी रोजी विधानसभा निवडणुका होणार आहेत आणि 8 फेब्रुवारी रोजी निकाल जाहीर होणार आहेत.