RG Kar Rape Case Verdict: पश्चिम बंगालच्या कोलकातामध्ये 5 महिन्यांपूर्वी संपूर्ण देशाला हादरवून सोडणारी घटना घडली होती. रात्रीच्या वेळी रुग्णालयात शिरून एका माथेफिरूने तरूण प्रशिक्षणार्थी डॉक्टरवर बलात्कार केला. त्यानंतर तिची निर्घूण हत्या केली. विशेष म्हणजे या घटनेवेळी तिच्या बचावासाठी तिथे कोणताही सुरक्षारक्षक नव्हता. त्यानंतर तिच्या मृत्यूचे कारण लपवण्यासाठीही मोठा प्रयत्न झाला. आज या गुन्ह्यातील आरोपी संजय रॉय याला शिक्षा सुनावण्यात येणार आहे. त्याच्यावर असलेल्या विविध कलमांच्या आधारे त्याला शिक्षा सुनावली जाईल. दुपारी 1 वाजतेपर्यंत ही शिक्षा सुनावली जाईल. (RG Kar Rape Case Verdict: आरजी कर बलात्कार प्रकरणात संजय रॉय दोषी, '25 वर्षे तुरुंगवास किंवा फाशीची शिक्षा' होण्याची शक्यता)
10 ऑगस्ट 2024 रोजी अटक
आरजी कार रुग्णालयाच्या सेमिनार रूममध्ये 31 वर्षीय डॉक्टरचा मृतदेह आढळल्यानंतर दुसऱ्या दिवशी म्हणजे 10 ऑगस्ट रोजी संजयला अटक करण्यात आली. न्यायाधीशांनी त्याला भारतीय दंड संहिता (IPC) च्या कलम 64, 66 आणि 103 (1) अंतर्गत दोषी ठरवले.
शिक्षेची तरतूद
बीएनएसच्या कलम 64(बलात्कार) मध्ये किमान 10 वर्षांची शिक्षा आहे, जी जन्मठेपेपर्यंत वाढू शकते. कलम 66 अंतर्गत, किमान 20 वर्षे शिक्षा आणि ती जन्मठेपेपर्यंत वाढवता येते. बीएनएसच्या कलम 103(1) (खून) नुसार दोषी ठरलेल्या व्यक्तीला मृत्युदंड किंवा जन्मठेपेची शिक्षा आहे.
सियालदाह न्यायालयात सुमारे 500 पोलिस तैनात करून सुरक्षा व्यवस्था कडक करण्यात आली आहे. कोणताही अनुचित प्रकार घडू नये यावर प्रशासनाचे संपूर्ण लक्ष आहे. मोठ्या प्रमाणात पोलिस बंदोबस्त असूनही, न्यायालयाच्या आवारात मोठ्या संख्येने लोक गर्दी करत आहेत.
सीबीआयच्या तपासावर नाराजी
मृत डॉक्टरच्या आईने सीबीआय तपासावर नाराजी व्यक्त केली. त्यांनी म्हटले की, 'गुन्ह्यात सहभागी असलेल्या इतर दोषींना शिक्षा मिळाली नाही या गुन्ह्यात फक्त एकच व्यक्ती सहभागी नाही, तरीही सीबीआय इतरांना पकडण्यात अपयशी ठरली आहे. समाजात भविष्यात होणारे गुन्हे रोखायचे असतील तर अशा गुन्हेगारांना जगण्याचा अधिकार नाही.', असे त्यांनी म्हटले.