
26 जानेवारी 1950 रोजी भारतीय राज्यघटना अस्तित्वात आली. आता 26 जानेवारी 2020 रोजी भारत आपला 71 वा प्रजासत्ताक दिन (71st Republic Day) साजरा करणार आहे. यासाठी सरकारची जोरात तयारी सुरू आहे. सरकारसोबत हा कार्यक्रम यशस्वी करण्याचे श्रेय, प्रजासत्ताक महोत्सवात भाग घेणाऱ्या पाहुण्यांनाही जाते. यंदाचा प्रजासत्ताक दिन साजरा करण्यासाठी देशभरातून अनेक लोक दिल्लीला पोहोचले आहेत.
प्रत्येक वर्षी प्रजासत्ताक दिनी कोणालातरी मुख्य पाहुणे म्हणून बोलण्याचे आमंत्रण दिले जाते. यावेळी ब्राझीलचे राष्ट्राध्यक्ष जैर बोलसोनोरो (Jair Bolsonaro) यांना प्रजासत्ताक दिनाचे प्रमुख पाहुणे म्हणून आमंत्रित करण्यात आले आहे. बोलसोनोरो यांना हे आमंत्रण पंतप्रधान मोदींनी ब्रिक्स परिषदेतच दिले होते.
ब्राझीलचे राष्ट्राध्यक्ष 24 ते 27 जानेवारी दरम्यान भारत दौर्यावर येणार आहेत. प्रजासत्ताक दिन सोहळ्यामध्ये भाग घेण्याव्यतिरिक्त, बोलसोनोरो इतर अनेक कार्यक्रमांमध्ये भाग घेतील. 24 जानेवारी रोजी ब्राझीलचे राष्ट्राध्यक्ष आपल्या 7 कॅबिनेट मंत्री आणि अधिकाऱ्यांसोबत दिल्लीला पोहोचतील. यापूर्वी 1996 आणि 2004 मध्ये ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांनी प्रमुख पाहुणे म्हणून प्रजासत्ताक दिनी भाग घेतला होता. (हेही वाचा: प्रजासत्ताक दिन परेड साठी महाराष्ट्र, केरळ यांना वगळून 'या' 16 राज्यांच्या चित्ररथाला मिळाली संधी; संरक्षण दलाने जाहीर केली यादी)
व्यापार आणि गुंतवणूकीच्या बाबतीत ब्राझील हा भारताचा महत्त्वपूर्ण भागीदार आहे. भारत आणि ब्राझीलमधील व्यापार गेल्या वर्षी 8.2 अब्ज अमेरिकन डॉलर्सपर्यंत पोहोचला. यामध्ये 3.8 अब्ज अमेरिकन डॉलर्सची निर्यात भारताकडून केली गेली तर ब्राझीलची आयातही 4.4 अमेरिकन डॉलर्स इतकी झाली. दरम्यान, यावेळी आपल्याला प्रजासत्ताक दिनाच्या परेडमध्ये काहीतरी नवीन पाहायला मिळणार आहे. आतापर्यंत आपण सीआरपीएफमध्ये महिलांची 'डेअर डेव्हिल' पथक आहे, असे ऐकून होतो. आता 26 जानेवारी रोजी हे पथक पहिल्यांदाच देशासमोर आपले शौर्य दाखवणार आहेत. प्रजासत्ताक दिनाच्या परेडमध्ये सीआरपीएफच्या 'डेअर डेव्हिल' महिला बाईकवर विविध स्टंट दाखवतील.