पंतप्रधान नरेंद्र मोदींना न्यायालयाचा दणका; सरकारी घरांमधून प्रतिमा हटविण्याचे आदेश
संग्रहित आणि संपादित प्रतिमा (Photo credits:Social media)

मध्य प्रदेशमध्ये सरकारी घरांमध्ये लावण्यात आलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहाण यांच्या प्रतिमा हटविण्यात येणार आहेत. उच्च न्यायालयाच्या ग्वालियर खंडपीठाने दिलेल्या आदेशानुसार ही कारवाई करण्यात येईल. न्यायालयाने हा आदेश बुधवारी (२० सप्टेंबर) दिला. पंतप्रधान गृहनिर्माण योजना म्हणजेच 'पीएमएवाय' अंतर्गत मध्य प्रदेशमध्ये घरे बांधण्यात आली होती. या घरांमध्ये पंतप्रधान मोदी आणि मुख्यमंत्री चौहाण यांची प्रतिमा असलेल्या भव्य टाईल्स लावण्यात आल्या होत्या.

दरम्यान, या टाईल्स (प्रतिमा) हटविण्याचे आदेश न्यायालयाने दिले. या प्रतिमा हटविण्यासाठी न्यायालयाने सरकारला २० डिसेंबर पर्यंतची मुदत दिली आहे. तसेच, घरामध्ये कोणत्याही नेत्याचे फोटो लावू नयेत, असेही मत न्यायालयाने व्यक्त केले. केंद्र सरकारने यापूर्वी न्यायालयात सांगितले होते की, पंतप्रधान आणि मुख्यमंत्र्यांची सरकारी घरांमध्ये लावण्यात आलेल्या प्रतिमा हटविण्यात येतील. मात्र, सरकारने न्यायायलयात मंगळवारी (१८ सप्टेंबर) सांगितले की, या प्रतिमा हटविण्याबाबत आदेश देण्यात आले आहेत. यापुढे टाईल्सवर केवळ पीएमएवायचा लोगोच दिसेल.

सरकारी घरांमध्ये पंतप्रधान, मुख्यमंत्र्यांच्या प्रतिमा असलेल्या टाईल्स लावण्याच्या निर्णयाविरोधात जुलै महिन्यात एक जनहित याचिका (पीआयएल) उच्च न्यायालयात दाखल करण्यात आली होती. पंतप्रधान मोदी आणि मुख्यमंत्री चौहाण यांच्या प्रतिमा असलेल्या टाईल्स सरकारी घरांमध्ये का वापरण्यात आल्या? असा सवाल याचिकाकर्त्याने उपस्थित केला होता. जनतेच्या पैशांतून उभारलेल्या घरांमध्ये निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन फुकटात प्रसिद्धीचा फायदा लाटण्यासाठीच हा निर्णय घेण्यात आला, असा युक्तीवाद याचिकाकर्त्याच्या वकिलाने न्यायालयात केला.