रिलायन्स रिटेल ने 620 कोटी रुपयांत खरेदी केली 'नेटमेड्स' ई-फार्मा कंपनीची भागीदारी
Mukesh Ambani (Photo Credit: File Photo)

रिलायंस रिटेल वेंचर्स लिमिटेड (आरआरवीएल) ने डिजिटल फार्मा मार्केट प्लेस 'नेटमेड्स'मध्ये (Netmeds) 620 कोटी रुपयांचे शेअर खरेदी केले आहेत. रिलायन्स इंडस्ट्रीजने ऑनलाइन फार्मसी कंपनी नेटमेड्समध्ये 620 कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे. रिलायंसने विटालिक हेल्थ आणि त्याच्या सब्सिडियरी कंपन्यांमधील 60 भागीदारी विकत घेतली आहे. रिलायंसने सहायक कंपन्या असलेल्या त्रिसारा हेल्थ प्राइवेट लिमिटेड, नेटमेड्स मार्केट प्लेस लिमिटेड आणि दाधा फार्मा डिस्ट्रिब्यूशन प्राइवेट लिमिटेडमध्ये 100 टक्के भागीदारी विकत घेतली आहे.

नेटमेड्स एक ई-फार्मा कंपनी आहे. या पोर्टलवर प्रिस्क्रिप्शनवर आधारित आणि ओवर-द-काउंटर औषधे व हेल्थ उत्पादनांची विक्री केली जाते. ही कंपनी देशात 20 हजाराहून अधिक ठिकाणी सेवा देते. 2015 मध्ये नेटमेड्स या कंपनीची स्थापना झाली होती. (हेही वाचा - Salaried Job Cuts: कोरोना विषाणूमुळे भारतामध्ये एप्रिल पासून 1.89 कोटी लोकांच्या नोकऱ्या गेल्या; जुलैमध्ये 50 लाख लोकांनी नोकऱ्या गमावल्या – CMIE)

रिलायन्स समुहाच्या संचालक ईशा अंबानी (Isha Ambani) यांनी यासंदर्भात माहिती देताना सांगितले की, 'ही गुंतवणूक भारतामध्ये सर्वांसाठी डिजिटल पोहोचं प्रदान करण्याच्या आम्ही दिलेल्या आश्वासनाशी निगडीत आहे. नेटमेड्स जोडले गेल्यामुळे उत्तम दर्जाचे आणि परवडणारे हेल्थकेअर प्रोडक्ट्स आणि सेवा देण्याची रिलायन्स रिटेलची क्षमता वाढली आहे. त्याचप्रमाणे ग्राहकांच्या दैनंदिन गरजा लवकरात लवकर पूर्ण करण्यासाठी डिजिटल प्लॅटफॉर्मचा विस्तार करण्यात येईल. या गुंतवणूक आणि भागीदारीमुळे व्यवसायात आणखी वाढ आणि तेजी येईल, असा विश्वासदेखील यावेळी ईशा अंबानी यांनी व्यक्त केला.

नेटमेड्स ऑनलाइन माध्यमातून ग्राहकांना औषध विक्रेत्यांशी जोडते. याशिवाय औषधांची घरपोच डिलिव्हरी करते. ई-कॉमर्स कंपनी अॅमेझॉन आणि फ्लिपकार्टने ऑनलाइन फार्मसी क्षेत्रात उतरण्याची घोषणा केली आहे. त्यामुळे या तीन कंपन्यात मोठी स्पर्धा पाहायला मिळणार आहे. दरम्यान, रिलायन्स कुटुंबामध्ये सामील होणे आणि चांगल्या दर्जाच्या परवडणाऱ्या आणि सर्वांपर्यंत पोहोचवणारे हेल्थकेअर भारतीयांपर्यंत पोहचवण्यासाठी एकत्र काम करणे ही खरोखर 'नेटमेड्स'साठी अभिमानाची बाबत आहे, अशी प्रतिक्रिया नेटमेड्सचे संस्थापक आणि सीईओ प्रदीप दाधा यांनी दिली आहे.