Rajasthan: राजस्थानचे नवे मुख्यमंत्री भजनलाल शर्मा (CM Bhajanlal Sharma) यांच्यासोबत एकामागून एक विचित्र घटना घडत आहेत. बुधवारी कारागृहात असलेल्या आरोपींनी त्यांना जीवे मारण्याची धमकी दिली होती. गेल्या मंगळवारी ते दिल्लीला गेले असताना त्यांच्या खोलीला आग (Fire) लागल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. मध्यरात्री मुख्यमंत्र्यांच्या दालनात आग लागली, त्यानंतर त्यांनी बेल वाजवून सुरक्षा कर्मचाऱ्यांना बोलावले. त्यानंतर आग तातडीने विझवण्यात आली. या प्रकरणाच्या चौकशीसाठी एक समितीही स्थापन करण्यात आली आहे.
कसा झाला अपघात ?
मिळालेल्या माहितीनुसार, सीएम भजनलाल मंगळवारी रात्री दिल्लीत होते. रात्री ते दिल्लीतील जोधपूर हाऊसमध्ये थांबले होते. त्यांच्या खोलीत लावलेल्या हिटरच्या इलेक्ट्रिक प्लगमध्ये शॉर्टसर्किट झाल्याने ही आग लागली. रात्री 2 वाजता प्लगमधून धूर निघू लागला, ते पाहून मुख्यमंत्र्यांनी बेल वाजवली. त्यानंतर सुरक्षा कर्मचाऱ्यांनी आग विझवली. या प्रकरणी एका कनिष्ठ अभियंत्याला निलंबित करण्यात आले असून या प्रकरणाच्या चौकशीसाठी समिती स्थापन करण्यात आली आहे. (हेही वाचा -Who is Bhajan Lal Sharma: पहिल्यांदाच आमदार, लागली मुख्यमंत्री पदाची लॉटरी, जाणून घ्या कोण आहेत भजलाल शर्मा)
दरम्यान, राजस्थानचे नवनिर्वाचित मुख्यमंत्री भजनलाल शर्मा यांना बुधवारी जीवे मारण्याची धमकी देण्यात आली होती. पोलीस नियंत्रण कक्षात सीएम भजनलाल यांना जीवे मारण्याची धमकी देणारा फोन आला होता. पोलिसांनी फोन करणाऱ्याचे लोकेशन त्वरीत ट्रेस केले आणि हा कॉल जेलमधून केल्याचे निष्पन्न झाले. याप्रकरणी कारागृह प्रशासनाच्या दोन वॉर्डनना निलंबित करण्यात आले आहे.
जयपूर सेंट्रल जेलमधून सीएम भजनलाल शर्मा यांना जीवे मारण्याची धमकी देणारा फोन आला होता. घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, धमकी देणारा आरोपी हा पॉक्सो कायद्यांतर्गत मध्यवर्ती कारागृहात शिक्षा भोगत असलेला कैदी असल्याचे आढळून आले. गेल्या 5 वर्षांपासून तो तुरुंगात असून त्याच्यावर मानसिक रुग्णालयात उपचारही सुरू आहेत.