Rahul Gandhi, Priyanka Gandhi ( फोटो क्रेडिट- PTI )

उत्तर प्रदेशमधील (Uttar Pradesh) हाथरस आणि बलरामपूर (Balrampur) येथील तरुणींवर सामूहिक बलात्काराच्या (Gangrape) घटनेनंतर संपूर्ण देश पेटून उठला आहे. सध्या देशातील नागरिकांकडून या घटनेतील दोषींना कठोर शिक्षा देण्यात यावी, अशी मागणी जोर धरत आहे. याशिवाय विरोधा पक्षांनी उत्तर प्रदेश सरकारवर टीकेची झोड उठवली आहे. या सर्व प्रकारानंतर काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी वड्रा (Priyanka Gandhi Vadra) यांनी पुन्हा एकदा यूपी सरकारवर निशाणा साधला आहे. हाथरस येथील घटना ताजी असतानाचं बलरामपूरमध्येदेखील सामूहिक बलात्काराची घटना घडली.

आज राहुल आणि प्रियंका गांधी हाथरसमधील पीडितेच्या कुटुंबियांची भेट घेणार आहेत. हाथरस जिल्ह्याची सिमा सील करण्यात आली असून जिल्ह्यात 144 कलम लागू करण्यात आलं आहे. त्यामुळे याठिकाणी 5 किंवा त्यापेक्षा अधिक लोकांना एकत्रित येण्यास बंदी घातली आहे. (हेही वाचा - Balrampur Gangrape: उत्तर प्रदेशमध्ये पुन्हा एकदा सामूहिक बलात्कार; आरोपींनी कंबर, पाय तोडलेल्या पीडितेचा मृत्यू, बलरामपूर येथील घटना)

दरम्यान, प्रियंका गांधी यांनी हाथरस प्रकरणी आपल्या ट्विटर हँडलवरून एक पोस्ट केली आहे. यामध्ये त्यांनी म्हटलं आहे की, 'उत्तर प्रदेशमध्ये जंगलराज पसरण्याला मर्यादा नाही. विपणन आणि भाषणाने कायदा व सुव्यवस्था निर्माण होत नाही. ही मुख्यमंत्र्यांच्या उत्तरदायित्वाची वेळ आहे. त्यांनी जनतेला उत्तरे द्यायला हवी.'

हाथरस प्रकरणी राहुल गांधी यांनीदेखील आक्रमक भूमिका घेतल्याचं पाहायला मिळत आहे. राहुल गांधी यांनी आपल्या ट्विट हँडलवरून 'भारताच्या लेकीवर अत्याचार करुन हत्या केली जाते. सत्य लपवलं जात आहे आणि शेवटी तिच्या परिवाराचा अंत्यसंस्कार करण्याचा हक्कदेखील हिरावला जात आहे, असं ट्वीट केलं आहे. या पोस्टसोबत राहुल गांधी यांनी एक व्हिडिओदेखील शेअर केला आहे.