काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर भ्रष्टाचाराचा आरोप केला आहे. पंतप्रधान मोदी यांच्यावर थेट भ्रष्टाचाराचा आरोप होण्याची ही पहिलीच वेळ आहे. राहुल गांधी यांनी गुरुवारी (११ ऑक्टोबर) घेतलेल्या पत्रकार परिषदेत मोदींवर आरोप केले. मोदींनी जनतेची चौकीदारी केली नाही तर, त्यांनी अनिल अंबानी यांचीच 'चौकीदारी' केल्याचा आरोप राहुल यांनी केला आहे. पत्रकार परिषदेत राहुल गांधी यांनी सांगितले की, फ्रान्सच्या माजी राष्ट्रपतींनीच खुलासा केला आहे की, स्वत: पंतप्रधानांनीच राफेलचे डीलमध्ये रिलायन्सचा समावेश असावा असे सांगितले होते. एका वरिष्ठ अधिकाऱ्यानेही राफेलबाबत असेच विधान केले आहे. यावरून स्पष्टच दिसते की, राफेल हे एक भ्रष्टाचाराचे प्रकरण आहे.
दरम्यान, राहुल गांधी यांनी संरक्षणमंत्री निर्मला सितारामण यांच्या फ्रान्स दौऱ्यावरही जोरदार टीकास्त्र सोडले आहे. संरक्षणमंत्री सितारामण फ्रान्स दौऱ्यावर अचानक का गेल्या. अशी काय अणिबाणी (एमरजन्सी) आली होती? त्या इतक्या तातडीने फ्रान्सला गेल्या. फ्रान्स दौऱ्यात त्यांना डसॉल्ट एव्हिएशनच्या फॅक्ट्रीला भेट का द्यावीशी वाटली? अशी प्रश्नांची सरबत्ती राहुल यांनी केली आहे. दरम्यान, देशाच्या युवकांना आणि जनतेला मी स्पष्टपणे सांगू इच्छितो की, देशाचे पंतप्रधान एक भ्रष्ट व्यक्ती आहेत. (हेही वाचा,राफेल डील: तांत्रिक बाबींची नको, निर्णय प्रक्रियेची माहिती द्या; सुप्रीम कोर्टाचे केंद्र सरकारला निर्देश)
अनिल अंबानी यांच्यावर ४५ हजार कोटी रुपयांचे कर्ज आहे. त्यांनी १० दिवसांपूर्वी कंपनी उघडली. त्यात पंतप्रधानांनी हिंदुस्तानच्या जनतेचे आणि एअरफोर्सचे ३० हजार कोटी रुपये, अंबानी यांच्या खिशात टाकले. देशातील युवक आज नोकरीच्या शोधात आहे आणि दुसऱ्या बाजूला पंतप्रधान अनिल अंबानींची चौकीदारी करत आहेत. देशात महत्त्वाचा मुद्दा आहे तो भ्रष्टाचाराचा. या मुद्द्यावर पंतप्रधान मात्र काहीच बोलत नाहीत. राफेल डीलमध्ये पंतप्रधानांनी सरळ-सरळ भ्रष्टाचार केला आहे. या भ्रष्टाचाराची चौकशी करण्यात आली होती.