PM Modi, Tiger (PC -PTI, Wikimedia commons)

Tiger Count Numbers In India: पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी वाघांची नवीन आकडेवारी जाहीर केली आहे. या नवीन आकडेवारीनुसार देशात वाघांची संख्या 3167 वर पोहोचली आहे. यापूर्वी हा आकडा 2967 इतका होता. अशाप्रकारे देशात वाघांच्या संख्येत 200 ने वाढ झाली आहे. टायगर प्रकल्पाला 50 वर्षे पूर्ण झाल्याबद्दल पंतप्रधान मोदींनी इंटरनॅशनल बिग कॅट्स अलायन्स (IBCA) लाँच केले.

यावेळी पंतप्रधानांनी स्मरणार्थी नाणेही जारी केले. कार्यक्रमादरम्यान केंद्रीय वन आणि पर्यावरण मंत्री भूपेंद्र यादव यांनी सांगितलं की, देशात वाघांच्या संवर्धनाची सुरुवात 1973 मध्ये नऊ व्याघ्र राखीव क्षेत्रापासून झाली. आज त्यांची संख्या 53 व्याघ्र प्रकल्पांवर पोहोचली आहे. यापैकी 23 व्याघ्र प्रकल्पांना आंतरराष्ट्रीय मान्यता मिळाली आहे. (हेही वाचा - PM Modi Feeding Elephant Video: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची Theppakadu Elephant Camp ला भेट; हत्तीला खाऊ घातला ऊस (Watch))

यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, प्रोजेक्ट टायगरने देशातील वाघांचे संवर्धन आणि संरक्षण करण्यात आघाडीची भूमिका बजावली आहे. निसर्गाचे रक्षण करणे हा भारतीय संस्कृतीचा एक भाग आहे. प्रोजेक्ट टायगरचे यश केवळ भारतासाठीच नाही तर संपूर्ण जगासाठी अभिमानाची बाब आहे. भारताला स्वातंत्र्य मिळून 75 वर्षे पूर्ण झाली आहेत. तथापी, जगातील 75 टक्के वाघ भारतात राहतात.

पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, 'प्रोजेक्ट टायगरला 50 वर्षे पूर्ण होत असताना आम्ही एका महत्त्वाच्या काळाचे साक्षीदार आहोत. भारताने केवळ वाघांना वाचवले नाही तर त्यांना एक अशी परिसंस्थाही दिली ज्यातून त्यांची भरभराट होऊ शकते. जगाच्या एकूण भूभागापैकी केवळ 2.4 टक्के क्षेत्रफळ आपल्याकडे आहे. पण जागतिक विविधतेत आपला वाटा 8 टक्के आहे. अनेक दशकांपूर्वी भारतातून चित्ता नामशेष झाला होता. पण आम्ही दक्षिण आफ्रिका आणि नामिबियामधून चित्ता आणले आणि एका देशातून दुसऱ्या देशात चित्ता आणण्यात आम्ही यशस्वी झालो आहोत. आपल्या देशात जगातील सर्वाधिक आशियाई हत्ती आहेत.