महाराष्ट्र नंतर आता गोवा आणि मग संपूर्ण देश भाजप मुक्त करू; लवकरच पाहायला मिळेल राजकीय चमत्कार: संजय राऊत
Sanjay Raut | (Photo Credits: ANI)

महाराष्ट्राच्या राजकारणात (Maharashtra Politics) अखेरीस आता कुठे स्थिरतेची चिन्हे दिसत असताना शिवसेना (Shivsena) खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी एका वेगळ्या मार्गाने भाजपवर (BJP)  हल्ला करण्याचे योजल्याची माहिती माध्यमांना दिली आहे. आता महाराष्ट्र पाठोपाठच गोव्यात (Goa Government)  सुद्धा भाजपचे सरकार पाडून हळूहळू संपूर्ण देश भाजपमुक्त (Non-BJP) करू असाही इशारा राऊत यांनी दिला. गोव्याच्या सद्य स्थितीतील सरकारचे काही आमदार शिवसेनेच्या संपर्कात आहेत आणि त्यांच्या सोबत मिळून आता गोव्याच्या राजकारणाला नवीन वळण देण्याचे आम्ही योजत आहोत. लवकरच आपल्याला एक राजकीय चमत्कार पाहायला मिळणार आहे असे राऊत यांनी सांगितले.

प्राप्त माहितीनुसार, गोवा फॉरवर्ड पार्टीचे अध्यक्ष आणि माजी उपमुख्यमंत्री विजय सरदेसाई हे आपल्या तीन आमदारांच्या सहित शिवसेनेच्या सोबत असल्याचे राऊत म्हणाले, या आमदारांच्या पाठिंब्याने गोव्यातून सुद्धा भाजप काढून टाकणार असल्याची तयारी देखील त्यांनी दर्शवली. मुख्यमंत्री झाल्यावर उद्धव ठाकरे यांनी घेतले 'हे' महत्वाचे निर्णय; सहा मंत्र्यांसह पार पडली पहिली कॅबिनेट बैठक

ANI ट्विट

दरम्यान, विधानसभा निवडणुकीपासून सुरु असणाऱ्या महाराष्ट्र सत्तासंघर्षात संजय राऊत यांनी कमालीची लीड घेतली होती, शिवसेनेचा गाडा हाकताना अनेकदा त्यांनी पूर्व मित्रपक्ष भाजपवर घणाघाती हल्ले सुद्धा केले. आता तर अखेरीस सेनेचे नेतृत्व उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यावर शिवसेना सत्तेच्या प्रश्नावर आणखीनच आक्रमक झाल्याचे दिसून येत आहे.

आजवर महायुतीच्या माध्यमातून भाजप सोबत मिळून सरकार स्थापनेचा दावा करणाऱ्या शिवसेनेच्या नेतृत्वाकडून असे विधान येणे हे आश्चर्यकारक आहे. दुसरीकडे आज उद्धव ठाकरे हे आपला पदभार स्वीकारणार असून दुसरीकडे येत्या काळात देवेंद्र फडणवीस सहित भाजप विरोधी पक्षाची भूमिका मांडणार आहे.