मुंबई: ‘अपना टाइम आयेगा’ मुंबादेवी दर्शनानंतर रॉबर्ट वाड्रा यांचे सूचक विधान, काही जणांकडून मोदी-मोदींच्या घोषणा
Robert Vadra (Photo Credits: IANS)

Lok Sabha Elections 2019: रॉबर्ट वाड्रा (Robert Vadra) यांनी आज राजधानी मुंबई येथे येऊन प्रसिद्ध मुंबादेवी (Mumba Devi) दर्शन घेतलं. रॉबर्ट हे मुंबईत आल्याचे निमित्त साधत प्रसारमाध्यमांनी त्यांच्याशी संवाद साधला. या वेळी प्रसारमाध्यमांच्या प्रश्नांना मनमोकळी उत्तरे देत सध्या आपण राजकारणावर बोलण्याचा प्रयत्न करत आहे. पण, मी आणखी शिकत आहे. वेळ प्रत्येकाची येते. माझीही येईल. असे सांगत रॉबर्ट यांनी भविष्याबाबत सूचक विधानही केले. दरम्यान, वाड्रा हे मुंबईत मुंबादेवीच्या दर्शनाला आले असता काही लोकांनी त्यांच्यासमोर मोदी-मोदीच्या घोषणा दिल्या.

दरम्यान, प्रसारमाध्यमांशी बोलताना रॉबर्ट वाड्रा म्हणाले, देशसेवा ही प्रियंका गांधी, राहुल गांधी यांच्या रक्तातच आहे. माझ्या पत्नीच्या (प्रियंका गांधी) कुटुंबाने देशासाठी आपले बलिदान दिलं आहे. दरम्यान, पंतप्रधान मोदी यांच्याकडून माजी पंतप्रधान दिवंगत राजीव गांधी यांच्यावर केल्या जाणाऱ्या टीकेबाबत विचारले असता राजकारणात सर्वांनीच मर्यदा पाळायला हवी. त्याबाबत मला जे वाटलं ते मत मी फेसबुकवर व्यक्त केल्याचंही ते म्हणाले.

दरम्यान, आपल्यावर केल्या जाणाऱ्या आरोपांचे काय? असे विचारले असता रॉबर्ट वाड्रा म्हणाले, गेली पाच वर्षे भाजप सरकार सत्तेत आहे. जी कोणती चौकशी करायची आहे ती सरकारने करावी. आपण सर्व प्रकारच्या चौकशीला सामोरे जायला तयार आहोत. न्यायालयाने प्रकरणाची सर्व चौकशी केल्यानंतर योग्य तो निर्णयही दिला. मी न्यायव्यवस्था आणि कायद्यावर विश्वास ठेवतो. आपण न्यायालयापेक्षा मोठे नाही. न्यायासाठी आपण न्यायालयात जाऊ. तिथे आपल्याला न्याय मिळेल यावर मला पूर्ण विश्वास आहे. माझ्यावर अनेक आरोप झाले. पण त्यापैकी एकही गोष्ट अद्याप सिद्ध झाली नसल्याचेही रॉबर्ट वाड्रा यांनी या वेळी सांगितले. (हेही वाचा, Lok Sabha Elections 2019 : 'रॉबर्ट वाड्रा यांचे सहर्ष स्वागत' मतदारसंघात पोस्टर्स झळकले, राजकीय वर्तुळात खळबळ)

राहुल गांधी पंतप्रधान होतील काय? असे विचारले असता याबाबत आपण कोणीच काही ठरवू शकत नाही. या देशातील जनताच योग्य त्या वेळी योग्य तो निर्णय घेईल. त्यामुळे या विषयावर आपण भाष्य करु शकत नसल्याचेही वाड्रा यांनी या वेळी सांगितले. दरम्यान, बहुमत मिळूनही केंद्रातील मोदी सरकारने काही केले नसल्याचा आरोपही त्यांनी या वेळी केला.