रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या निवडणूकीमध्ये यंदा भास्कर जाधव यांच्या घरात चढाओढ पहायला मिळण्याची शक्यता आहे. भास्कर जाधव यांचे पुत्र विक्रांत जाधव आणि त्यांचे भाऊ बाळ जाधव जिल्हा परिषदेवर अध्यक्षपदी जाण्यासाठी इच्छुक आहे. दरम्यान ही निवडणूक 22 मार्च ला होणार असून आता त्यासाठी फिल्डिंग सुरू झालं आहे. त्यामुळे महाराष्ट्रात अजून एका निवडणूकीत काका- पुतण्यातील चढाओढ पहायला मिळणार आहे.
मीडीया रिपोर्ट्सनुसार, भास्कर जाधव सध्या एनसीपी मध्ये असलेल्या त्यांच्या मुलासाठी फिल्डिंग करत आहेत तर शिवसेनेमध्ये असलेल्या बाळ जाधव यांच्यासाठी शिवसेना खासदार विनायक राऊत फिल्डिंग करत आहेत. अद्याप कोणत्याही नावावर शिक्कामोर्तब झालेले नाही. रत्नागिरीचे पालकमंत्री उदय सामंत देखील या चढाओढीत मातोश्री वर कोणाच्या नावाला पसंती देत आहेत याकडे अनेकांचे लक्ष लागले आहे.
दरम्यान रत्नागिरी जिल्हा परिषदेमध्ये अध्यक्ष आणि सभापतीची निवड 22 मार्च 2021 दिवशी होणार आहे. मागील सव्वा वर्ष शिवसेनेने ही पदं वाटून दिली होती पण अचानक आलेल्या कोविड 19 संकटामुळे कामं करण्याची संधी मिळाली नाही म्हणून सव्वा वर्ष झालेल्यांना मुदतवाढ देण्याची चर्चा झाली होती पण शिवसेना पक्षाकडून देण्यात आलेल्या आदेशानंतर सार्यांनी राजीनामा दिला आहे.
भास्कर जाधव हे एनसीपी मध्ये होते. विधानसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर त्यांना तिकीट न मिळाल्याने त्यांनी शिवसेनेची वाट धरली होती. गुहागर मतदारसंघातून भास्कर जाधव यांनी विजय देखील नोंदवला आहे पण त्यांना मंत्रीपदापासून दूर ठेवण्यात आलं आहे. त्यामुळे आता ते शिवसेनेवर देखील नाराज असल्याचं म्हटलं जातं.