Lok Sabha Election 2019: माढा येथून शरद पवार यांना राजू शेट्टी देणार आव्हान; स्वाभिमानीत ठराव मंजूर
Raju Shetty will challenge Sharad Pawar from Madha Lok Sabha constituency | (Photo Credits- File photo for representation only)

Lok Sabha Election 2019: पश्चिम महाराष्ट्रातील एक वलयांकीत मतदारसंघ अशी माढा लोकसभा मतदारसंघाची ( Madha Lok Sabha Constituency) ओळख. संयुक्त पुरोगामी आघाडीचे (UPA) ज्येष्ठ नेते आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी या मतदासंघातून निवडणूक लढवणार असल्याचे जाहीर केले. त्यानंतर विरोधी पक्षांमधून पवारांविरोधात कोण मैदानात उतरणार याबाबत उत्सुकता होती. दरम्यान, या चर्चेचीतल पहिले नाव पुढे आले असून, स्वाभिमानी शेतकरी संघटना (Swabhimani Shetkari Saghtana) सर्वेसर्वा राजू शेट्टी (Raju Shetti) माढा येथून शरद पवार (Sharad Pawar) यांना आव्हान देणार अशी शक्यता आहे.

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा एल्गार मेळावा नुकताच पार पडला. या मेळाव्यात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते खा. राजू शेट्टी यांनी हातकणंगले आणि माढा अशा दोन्ही मतदारसंघातून निवडणूक लढवावी असा ठराव मंजूर करण्यात आला. त्यामुळे ठरावानुसार राजू शेट्टी खरोखरच माढ्याच्या मैदानात उतरले तर शरद पवार यांच्यासमोरील आव्हान अधिक मोठे ठरेल. पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर, सातारा, सांगली आणि सोलापूर या जिल्ह्यांमध्ये राजू शेट्टी यांच्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेची संघटनात्मक बांधणी चांगली आहे. त्यामुळे 2014 मध्ये झालेल्या लोकसभा निवडणूकीत हातकणंगले मतदारसंघातून राजू शेट्टी मोठ्या मताधिक्क्याने विजयी झाले. तर त्या वेळी स्वाभिमानिचे माढा मतदारसंघातील उमेदवार असलेले सदाभाऊ खोत हे अल्पशा मतांनी पराभूत झाले. त्यामुळे हा इतिहास पाहता पवारांसमोरील आव्हान मोठे असल्याचे पुढे येते.

दरम्यान, माढा मतदारसंघातून शरद पवार यांच्या विरोधा भाजपकडून आपण मैदानात उतरणार असल्याचे सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनीही स्पष्ट केले आहे. त्यातच आता स्वाभिमानीनेही रणशिंग फुकले आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष रविकांत तुपकर यांनी वेळापूर येथील मेळाव्यात स्पष्ट केले की, आमच्या संघटनेची लोकसभेच्या 9 जागा लढविण्याची तयारी पूर्ण झाली आहे. त्यामुळे आघाडी झाली तर ठिक नाहीतर आण्ही स्वबळावर तयार आहोत. (हेही वाचा, बी जी कोळसे-पाटील निवडणुकीच्या मैदानात)

2014 मध्ये माढा येथून लढण्यासाठी राष्ट्रीय समाज पक्षाचे महादेव जानकर इच्छूक होते. मात्र, आघाडीच्या जागावाटपात भाजपने हा मतदारसंघ स्वाभिमानी शेतकरी संघटनेला सोडला. येथे स्वाभिमानीचे सदाभाऊ खोत उमेदवार होते. तर, महादेव जानकर हे बारामती लोकसभा मतदारसंघातून (Baramati Lok Sabha Constituency) सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांच्या विरोधात मैदानात होते. दरम्यान, या वेळी माढा येथून लढण्यासाठी महादेव जानकर यांच्याकडे विचारणा झाली. मात्र, जानकर यांनी माढ्यातून लढण्यास नकार देत आपण बारामतीतूनच लढण्याची तयारी करत आहोत असे स्पष्ट केले. त्यानंतर भाजपने सहकारमंत्री सुभाष देशमुख यांना मैदानात उतरवण्याची तयारी सुरु केली आहे.