आमदार रोहित पवार यांची उममुख्यमंत्री अजित पवार यांना भावनिक साद, फेसबुक पोस्टमध्ये काय म्हणाले पाहा
Rohit Pawar and Sharad Pawar | (Photo Credits: Facebook)

राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) पक्षात अजित पवार (Ajit Pawar) यांचे कथित बंड आणि उममुख्यमंत्री पदाची शपथ आणि पवार कुटुंबीयांमध्ये पडलेली फूट या सगळ्या नाट्यानंतर शरद पवार (Shrad Pawar) यांचे नातू आणि अजित पवार यांचे पुतणे रोहित पवार यांनी फेसबुकवर (Facebook) एक पोस्ट लिहीली आहे. या फेसबूक पोस्टमध्ये रोहित पवार यांनी काका अजित पवार यांना भावनिक साद घातली आहे. या पोस्टमध्ये रोहित पवार यांनी म्हटले आहे की, ”लवकरच महाविकास आघाडीचे सरकार सत्तेत येईल, पण यात हक्काची माणसं दूरावू नयेत असं व्यक्तिश: वाटतं.”

आमदार रोहित पवार यांनी फेसबुक पोस्टमध्ये नेमकं काय म्हटलंय ?

लहानपणापासून साहेबांना पहात आलो, प्रश्न राजकीय असो की कौंटुबिक साहेब कधी खचून जात नाहीत. माझे आजोबा अप्पासाहेब पवार गेल्यानंतर वडील राजेंद्र दादांना धीर देणारे साहेब मी पाहिले आहेत आणि अजितदादांचे वडील अनंतराव पवार गेल्यानंतर अजितदादांना सावरणारे देखील साहेबच होते.

अजितदादांच्या वडिलांच्या पश्चात दादांच्या लहानपणापासून त्यांना वडिलांचे प्रेम देणारे साहेबच होते. तसेच आदरणीय पवार साहेबांवर अडचण आल्यानंतर खंबीर भूमीका घेणारे अजितदादा देखील आपण पाहिले आहेत. प्रश्न कौटुंबिक असो की राजकिय खचून जाणं हे साहेबांच्या डिक्शनरीत नाही.

आजच्या घडामोडी पाहताना जूनं चित्र कायम तसच असावं. अजितदादांनी साहेबांचे निर्णय मान्य करावेत व स्वगृही परत यावं असं मनापासून वाटतं. साहेब राजकारण आणि कुटुंब कधीच एकत्र करत नाहीत व ते करणार देखील नाहीत,

पण कुठेतरी सर्वसामान्य घरातून एक व्यक्ती “पवार साहेब” होतो. सर्वसामान्यांच्या आवाज होतो व अखेरपर्यन्त लढत राहतो तेव्हा या देशातल्या अहंकारी शक्ती तो आवाज दाबू पहात आहेत अशा वेळी कुटूंबाचा एक घटक म्हणून व्यक्तिशः मला असं वाटतं की आपण सर्वांनी साहेबांच्या सोबत रहायला हवं.

लवकरच महाविकास आघाडीचे सरकार सत्तेत येईल पण यात हक्काची माणसं दूरावू नयेत असं व्यक्तिश: वाटतं.

रोहित पवार फेसबुक पोस्ट

NCP MLA Rohit Pawar Facebook Post

दरम्यान, आमदार रोहित पवार यांनी फेसबुकवर पोस्ट सोबत एक फोटोही शेअर केला आहे. या फोटोत शरद पवार, सुप्रिया सुळे, अजित पवार आणि रोहित पवार हे स्मितहास्य करताना दिसत आहे. यासोबतच रोहित पवार हे आमदार म्हणून निवडूण आले तेव्हाही ‘महाराष्ट्राचा लोकनेता’ असे म्हणत त्यांनी शरद पवार यांच्यासोबतचा फोटो पोस्ट केला होता.