पंतप्रधान मोदी यांनी (PM Narendra Modi) लोकसभेत (Loksabha) केलेल्या वक्तव्याविरोधात आज विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या घराबाहेर आंदोलन करण्याची घोषणा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी केली होती. त्यानुसार, आंदोलनाला सुरुवात झाली. परंतु, काही वेळातच मुंबईकरांची अधिक गैरसोय होऊ नये म्हणुन काँग्रेसने भाजपविरोधात (Congress Protest On BJP) पुकारलेले आजचे आंदोलन थांबवत असल्याची घोषणा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली. पण जोपर्यंत पंतप्रधान माफी मागत नाहीत तोपर्यंत आम्ही आंदोलन सुरूच ठेवू असे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले. दरम्यान काँग्रेसने केलेल्या आंदोलनावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते नवाब मलिक यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
काँग्रेसने केलेल्या आंदोलनाची भूमिका योग्य नाही
देवेंद्र फडणवीस यांच्या घराबाहेर आंदोलन करण्याची घोषणा करण्यात आली होती. ही भूमिका योग्य नाही, अशी भूमिका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय प्रवक्ते नवाब मलिक यांनी मांडली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संसदेत जे काही म्हटले, त्याबद्दल राष्ट्रवादी काँग्रेसने निषेध व्यक्त केलेला आहे. विशेषत: संसदेत खासदार सुप्रियाताई सुळे यांनी त्यावर भाष्य केलेले आहे. पंतप्रधानांच्या वक्तव्याचा निषेध करण्याचा अधिकार प्रत्येक राजकीय पक्षाला आहे. पण नेत्यांच्या घराबाहेर आंदोलन करण्याचा पायंडा लोकशाहीसाठी घातक असून यातून कायदा व सुव्यवस्थेचे प्रश्न निर्माण होतात. त्यामुळे लोकशाहीत अशा आंदोलनाला मान्यता देता येणार नाही, असे मत नवाब मलिक यांनी व्यक्त केले.
Tweet
आज काँग्रेसच्या वतीने विधानसभेचे विरोधी पक्षनेते मा. देवेंद्र फडणवीस यांच्या घराबाहेर आंदोलन करण्याची घोषणा करण्यात आली होती. ही भूमिका योग्य नाही, अशी भूमिका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय प्रवक्ते मा. @nawabmalikncp यांनी मांडली. #NCP pic.twitter.com/LaGCKb5s6m
— NCP (@NCPspeaks) February 14, 2022
मोदी सरकारच्या काळात रेकॉर्डब्रेक घोटाळे
दोन दिवसांपूर्वी एबीजी शिपींग कंपनीचा सुमारे २३ हजार कोटी रुपयांचा बँक घोटाळा समोर आला आहे. एकंदरीत मोदी सरकारच्या काळात रेकॉर्डब्रेक घोटाळे झाले आहेत, असे नवाब मलिक यांनी म्हटले आहे. सीबीआयचे छापे त्यांच्यावर पडले असूनही ईडी त्यावर शांत आहे. बँक बुडवण्याच्या कामात भाजपचे नेते, त्यांचे समर्थक सहभागी आहेत. त्यांना केंद्र सरकारचा पाठिंबा आहे, त्याशिवाय साडेपाच लाख कोटींचा घोटाळा होऊ शकत नाही, अशी टीका नवाब मलिक यांनी केली. (हे ही वाचा Devendra Fadnavis On Congress: नरेंद्र मोदींनी माफी मागण्याचा प्रश्नच येत नाही, देशाचं वाट्टोळं केल्याबद्दल काँग्रेसने देशाची माफी मागावी - देवेंद्र फडणवीस)
ना खाऊंगा, ना खाने दूँगा
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले होते की, ना खाऊंगा, ना खाने दूँगा. जनतेला खायला देत नाही, पण मोदींचे जवळचे लोक लाखो-करोडो रुपये खाऊन पळून जात आहेत, याचे उत्तर आता मोदींनी जनतेला दिले पाहीजे, अशी मागणी मलिक यांनी केली आहे.