Devendra Fadnavis On Congress: नरेंद्र मोदींनी माफी मागण्याचा प्रश्नच येत नाही, देशाचं वाट्टोळं केल्याबद्दल काँग्रेसने देशाची माफी मागावी - देवेंद्र फडणवीस
devendra Fadnavis (Photo Credit - Twitter)

पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी संसदेत (Loksabha) केलेल्या वक्तव्यामुळे महाराष्ट्राचा अपमान झाल्याच्या निषेधार्थ काँग्रेसकडून राज्यभर निषेध (Congress Protest ON BJP) करण्यात येत आहे. त्याअंतर्गत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी आज विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या मुंबईतील ‘सागर’ बंगल्याबाहेर आंदोलन आणि निदर्शने केली होती. मात्र पोलिसांनी सकाळपासून सागर बंगल्याकडे जाणारे दोन्ही रस्ते बंद करून काँग्रेस कार्यकर्त्यांना बंगल्यापर्यंत जाण्यापासून रोखले. काँग्रेसचे प्रवक्ते अतुल लोंढे (Atul Londhe) हे कसेबसे बंगल्यापर्यंत पोहोचण्यात यशस्वी झाले मात्र त्यांनाही पोलिसांनी पकडले. काँग्रेसच्या या आंदोलनाविरोधात भाजप नेते आणि कार्यकर्तेही आक्रमक दिसले. भाजप नेते प्रसाद लाड यांनी काल काँग्रेसला आव्हान दिलं होतं, 'तुम्ही देवेंद्र फडणवीस यांच्या बंगल्याभोवती याल, पण बघू कसे परत जाता.' काँग्रेसच्या आंदोलनाला आव्हान देण्यासाठी भाजप नेते सज्ज झाले होते.

मुंबई अध्यक्ष मंगल प्रभात लोढा यांच्या नेतृत्वाखाली भाजप कार्यकर्त्यांनी मुंबईतील मलबार येथील नाना पटोले यांच्या लक्ष्मी निवास इमारतीबाहेर निदर्शने केली. येथेही पोलिसांनी भाजप कार्यकर्त्यांना पकडून नेले. या सगळ्यात नाना पटोले यांनी काँग्रेसचे आंदोलन स्थगित केले. अशातच काँग्रेसचे आंदोलन फसल्यानंतर भाजप नेत्यांची देवेंद्र फडणवीस यांच्या घरी बैठक झाली. या संपूर्ण घटनेवर देवेंद्र फडणवीस यांनी आपली प्रतिक्रिया दिली.

Tweet

नाना पटोलेसारखे लोक नौटंकी आहेत

देवेंद्र फडणवीस म्हणाले, तुम्ही सगळे असूनही इथे येऊन आंदोलन करण्याची कोणाची हिंमत नाही. पंतप्रधान मोदींनी माफी मागण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. उलट काँग्रेसने देशाची माफी मागावी. काँग्रेसमुळे देशाच वाट्टोळ झाल. नाना पटोले सारखे लोक नौटंकी आहेत. त्याच्या नौटंकीचा काही परिणाम होणार नाही.

भाजप नेत्यांची देवेंद्र फडणवीस यांच्या घरी बैठक झाली

काँग्रेसचे आंदोलन स्थगित झाल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांच्या घरी झालेल्या बैठकीला आमदार आशिष शेलार, राजहंस सिंह, प्रसाद लाड, मंगलप्रभात लोढा, राम कदम, मनीषा चौधरी, कृपाशंकर सिंह, खासदार मनोज कोटक आदी नेते उपस्थित होते. काँग्रेसचे नेते आणि कार्यकर्ते त्यांच्या बंगल्यावर पोहोचल्यास फडणवीस यांना चोख प्रत्युत्तर देण्याच्या उद्देशाने हे सर्वजण येथे पोहोचले होते.