Mumbai: नवनीत राणा आणि रवी राणा यांच्या जामीन अर्जावर आज होणार सुनावणी
Navneet Rana, Ravi Rana | (Photo Credits: Facebook)

हनुमान चालिसाच्या निमित्ताने राज्यात राजकीय पारा चढला आहे. दरम्यान, अपक्ष खासदार नवनीत राणा (Navneet Rana) आणि आमदार पती रवी राणा (Ravi Rana) यांच्या जामीन अर्जावर आज मुंबईच्या सत्र न्यायालयात (Mumbai Sessions Court) सुनावणी होणार आहे. याप्रकरणी मुंबई पोलीस (Mumbai Police) आज न्यायालयात उत्तर सादर करणार आहेत. अपक्ष खासदार नवनीत राणा यांना मुंबईतील भायखळा महिला कारागृहात ठेवण्यात आले आहे. त्याच नवी मुंबईतील (Navi Mumbai) तळोजा कारागृहात त्यांचे आमदार पती रवी राणा बंद आहेत. या दाम्पत्याला तुरुंगातून बाहेर पडण्याचा मार्ग मिळेल की नाही याचा निर्णय मुंबईतील सत्र न्यायालय घेणार आहे. या दोघांच्या जामीन अर्जावर आज सत्र न्यायालयात सुनावणी होणार आहे.

यापूर्वी खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांच्या याचिकेवर 26 एप्रिल रोजी शेवटची सुनावणी झाली होती. त्यानंतर न्यायालयाने तुरुंगात असलेल्या दाम्पत्याच्या जामीन अर्जावर मुंबई पोलिसांना 29 एप्रिल रोजी उत्तर दाखल करण्यास सांगितले होते. पोलिसांच्या वतीने जबाब नोंदवल्यानंतर या दोघांनाही जामीन द्यायचा की नाही याचा निर्णय न्यायालय घेणार आहे. सध्या नवनीत राणा आणि रवी राणा 14 दिवसांच्या न्यायालयीन कोठडीत आहेत. मुंबई पोलिसांनी राणा दाम्पत्याविरुद्ध देशद्रोहाचा गुन्हाही दाखल केला आहे. दोघांच्या जामीन अर्जावर आज सुनावणी होणार आहे. (हे देखील वाचा: वस्तुस्थितीची शहानिशा न करता केंद्रावर आरोप करणे ही एक फॅशन झाली आहे, देवेंद्र फडणवीसांची टीका)

घरच्या जेवणाची केली मागणी

तर अमरावती येथील खासदार नवनीत राणा यांच्या घरी एक हजार दिव्यांची रोषणाई करण्यात आली आहे. युवा स्वाभिमान पक्षाच्या कार्यकर्त्यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. दरम्यान, गुरुवारी राणा दाम्पत्याने न्यायालयात आणखी एक याचिका दाखल केली. यामध्ये खासदार नवनीत राणा आणि त्यांचे पती रवी राणा यांनी तुरुंगात घरच्या जेवणाची मागणी केली आहे. राणा दाम्पत्याच्या या याचिकेवरही आज सुनावणी होण्याची शक्यता आहे.