नाशिक: सिन्रर नगरपालिकेतही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून पारनेर टच; शिवसेनेत नाराजी
Shiv Sena, NCP | (Photo Credits: Archived, edited, symbolic images)

नाशिक (Nashik) जिल्ह्यातील सिन्नर नगरपालिका (Sinnar Nagar Parishad) उपनगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीत (Deputy Mayor Election पुन्हा एकदा राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) पक्षाकडून पारनेर (Parner) टच देण्यात आला आहे. सिन्नर उपनगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीत शिवसेना (Shiv Sena) पक्षाच्या 5 नगरसेवकांनी बंडखोरी केली. हे नगरसेवक राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला सहकार्य करत असल्याचे दिसून आल्याने शिवसेनेच्या गोटात अस्वस्थता आहे. त्यामुळे महाविकासआघाडी म्हणून सत्तेत असलेले शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस हे पक्ष आपापल्याच मित्रपक्षांना धक्के देत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.

पारनेर येथेही या आधी काहीसा असाच प्रकार पाहायला मिळाला होता. पारनेर येथील पाच शिवसेना नगरसेवकांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्र्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला होता. शिवसेनेने या प्रकरणाची गंभीर दखल घेतल्या नंतर या नगरसेवकांची घरवापसी झाली होती. या वेळी 'आमचं महाविकास आघाडीचं सरकार असल्यामुळे फोडाफोडीचं राजकारण करायचं नाही, हे ठरलं आहे', असं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटले आहे.

कय घडलं सिन्नरमध्ये?

सिन्नर महापालिकेमध्ये गोविंद कोंबडे हे उपनगराध्यक्ष होते. मात्र, त्यांच्या राजीनाम्यामुळे उपनगराध्यक्ष पद रिक्त झाले. या पदासाठी ऑनलाईन पद्धतीने निवडणूक पार पडली. या वेळी शिवसेनेच्या 5 नगरसेवकांनी बंडखोरी केली. उपनगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीत सेनेने अपक्ष असलेल्या प्रणाली गोळेसर यांना उमेदवारी दिली. त्यामुळे सेना नगरसेवकांमध्ये खदखद असल्याचे सांगितले जाते. परिणामी या नगरसेवकांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला सहकार्य केले. (हेही वाचा, पारनेर: बाण भात्यात परतले; राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात गेलेल्या 'त्या' 5 नगरसेवकांची पुन्हा शिवसेना वापसी)

सिन्नर नगरपालिका पक्षीय बलाबल

  • एकूण नगरेवक संख्या- 29
  • स्थानिक आमदार माणिकराव कोकाटे समर्थक -10 नगरसेवक
  • सत्ताधारी शिवसेना आणि अपक्ष मिळून- 19 नगरसेवक

दरम्यान, उपाध्यक्ष पदाच्या निवडणुकीत शिवसेना गटनेते हेमंत वाजे यांनी 19 नगरसेवकांना अधिकृत व्हीप बजावला होता. हा व्हीप त्यांनी व्हॉट्सअॅप ग्रुपच्या माध्यमातून बजावला होता. असे असताना शिवसेनेचे पाच नगरसेवक अचाकनकपणे माणिकराव कोकाटे यांच्या संपर्कात आले. तसेच, त्यांनी बंडखोर उमेदवार बाळासाहेब उगले यांना उमेदवारी जाहीर केली. परिणामी निवडणुक काट्याची झाली. या शिवसेना उमेदवाराचा अवघ्या एका मताने पराभव झाला.