Videos: काँग्रेस कार्याध्यक्ष यशोमती ठाकूर यांचा पोलिसांसोबत राडा; मुंबईच्या सेंट जॉर्ज हॉस्पिटल येथील घटना
Maharashtra Congress Working Pres Yashomati Thakur | (Photo Credits: ANI)

महाराष्ट्र काँग्रेस नवनियुक्त कार्याध्यक्ष अ‍ॅड. यशोमती ठाकूर (Maharashtra Congress Working Pres Yashomati Thakur) यांनी मुंबई येथील सेंट जॉर्ज रुग्णालय (St George Hospital, Mumbai) गाठले. तेथे कर्नाटक काँग्रेस आमदार श्रीमंत पाटील हे उपचार घेत आहेत. आमदार श्रीमंत पाटील (Congress MLA Shrimant Patil) यांना भेटण्यासाठीच अॅड. यशोमती ठाकूर या तेथे पोहोचल्या खऱ्या. परंतू, पोलिसांनी त्यांना रुग्णालयाच्या दारावरच आडवले. या वेळी अॅड. यशोमती ठाकूर (Yashomati Thakur) आणि पोलीस यांच्यात जोरदार वादावादी झाली. या वादावादीचा व्हिडिओही व्हायरल झाला आहे.

वृत्तसंस्था एएनआयने आपल्या ट्विटर हँडलवर शेअर केलेल्या व्हिडिओत अॅड. यशोमती ठाकूर आणि मुंबई पोलीस यांच्यात जोरदार खडाजंगी होताना दिसत आहे. कर्नाटक काँग्रेस आमदार श्रीमंत पाटील यांच्यावर सेंट जॉर्ज रुग्णालयात हृदयाच्या आजारावर उपचार सुरु असल्याचे सांगितले जात होते. मात्र, रुग्णालयात जर कार्डियक यूनिटच नसेल तर, पाटील यांच्यावर हृदयाचे उपचार कसे केले जात आहेत? असा सवाल यशोमती ठाकूर यांनी उपस्थित केला आहे.

दरम्यान, कर्नाटक काँग्रेसने आरोप केला होता की, कर्नाटकमधील जेडीयू-काँग्रेस आघाडीचे कुमारस्वामी सरकार पाडण्यासाठी विरोधकांनी काँग्रेस आमदार श्रीमंत पाटील यांचे अपहरण केलेआहे. बंगळुरू पोलिसांकडे कर्नाटक काँग्रेसने तशी तक्रारही नोंदवली आहे. काँग्रेसने म्हटले आहे की, पक्ष आमदार रिसॉर्टमध्ये असताना श्रीमंत पाटील अचानक गायब झाले. त्यानंतर ते कोणाच्याही संपर्कात नाहीत.

एएनआय ट्विट

कर्नाटक विधानसभेत जेव्हा मुख्यमंत्री एच डी कुमारस्वामी यांच्या विश्वासदर्शक ठरावावर चर्चा सुरु झाली तेव्हा, ज्येष्ठ नेते डी. के. शिवकुमार यांनी आरोप केला की, पक्ष आमदार श्रीमंत पाटील यांचे अपहरण करुन त्यांना मुंबई येथील रुग्णालयात दाखर करण्यात आले आहे. दरम्यान, आमदार पाटील यांचा एक फोटो प्रसारीत झाला आहे ज्यात ते रुग्णालयातील एका बेडवर झोपले आहेत. डॉक्टर त्यांच्यावर इजीजी संबंधीत तपासणी करुन घेताना दिसत आहे. नेमका हाच मुद्दा उपस्थित करत शिवकुमार यांनी म्हटले की, मी अध्यक्षांना हात जोडून विनंती करतो की, माझ्या पक्ष आमदाराचे अपहरण झाले आहे. मला त्यांच्या कुटुंबीयांचा फोन आला होता. महोदय, मी आपणास विनंती करतो की, आपण त्यांना परत घेऊन यावे. आम्हाला पोलीस संरक्षणाची गरज असल्याचा, दावाही या वेळी शिवकुमार यांनी केला. (हेही वाचा,Karnataka Floor Test: गोंधळामुळे सभागृहाचे कामकाज उद्यापर्यंत स्थगित; विरोधकांना सरकार पाडण्याची घाई, रात्रभर करणार आंदोलन )

शिवकुमार यांनी आम्हाला पोलीस संरक्षणाची गरज आहे असे सांगताच काँग्रेस विधेकांनी एकाच वेळी मोठ्या आवाजात याला दुजोरा दिला. त्यांनी सभागृहात म्हटले की, आम्ही भीतीच्या छायेत वावरत आहोत. श्रीमंत पाटील यांचे एका खास विमानाने अपहरण करुन त्यांना एका रुग्णालयात भरती करण्यात आल्याचा आरोपही काही आमदारांनी केला.