Karnataka Floor Test: गोंधळामुळे सभागृहाचे कामकाज उद्यापर्यंत स्थगित; विरोधकांना सरकार पाडण्याची घाई, रात्रभर करणार आंदोलन
Karnataka Assembly Speaker KR Ramesh Kumar (Photo Credits: IANS)

कर्नाटक (karnataka) मधील राजकीय नाट्याने मोठे आगळे वळण घेतले आहे. बंडखोर आमदारांच्या राजीनाम्यावर सुप्रीम कोर्टाने महत्वाचा निर्णय दिल्यावर आज मुख्यमंत्री कुमारस्वामी (H D Kumaraswamy) यांना बहुमत सिद्ध करायचे होते. मात्र त्याआधीच कॉंग्रेस आमदारांनी गोंधळ घातल्याने, सभागृहाचे कामकाज थांबवण्यात आले. याबाबत भाजप आमदारांनी नाराजी व्यक्त करत आंदोलन सुरु केले. ठरल्याप्रमाणे आजच विश्वासदर्शक ठरावावर मतदान घ्यावे, या मागणीसाठी भाजप आमदार रात्रभर सभागृहाबाहेर धरणे आंदोलन करणार आहेत.

सर्वोच्च न्यायालयाने नुकताच काँग्रेस-जेडीएसच्या 15 बंडखोर आमदारांना विधानसभेत हजेरी लावण्यासाठी बळजबरी केली जाऊ शकत नाही व या राजीनाम्याबद्दल विधानसभा अध्यक्ष निर्णय घेतील असा निर्णय दिला होता. त्यानुसार आज (18 जुलै) रोजी कुमारस्वामी यांना आपले बहुमत सिद्ध करायचे होते. त्यासाठी राज्यपाल वजुभाई वाला यांनी गुरुवारी विश्वास दर्शक ठरावाची प्रक्रिया पूर्ण करा, असे लेखी पत्र अध्यक्ष रमेश कुमार यांना दिले होते. मात्र त्याकडे दुर्लक्ष करत कॉंग्रेस-जेडीएस च्या आमदारांनी सभागृहात गोंधळ घातला . त्यामुळे सभागृहाचे आजचे कामकाज तहकूब करून, उद्या (शुक्रवार) सकाळी 11 वाजल्यापासून विधानसभेच्या कामाला सुरुवात होणार आहे. (हेही वाचा: कुमारस्वामी सरकारला सुप्रीम कोर्टाचा झटका; विधानसभा अध्यक्ष घेणार आमदारांच्या राजीनाम्यावर निर्णय)

भाजपकडून बी. एस. येडियुराप्पा, कॉंग्रेसकडून सिद्धरामय्या, सध्याचे मुख्यमंत्री कुमारस्वामी असे तीनही मोठे नेते बोलत असताना आमदारांनी एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करणे सुरु ठेवले. यामुळे सभागृहाचे कामकाज नाईलाजाने थांबवण्यात आले. दरम्यान, आजच्या महत्वाच्या दिवशी तब्बल 19 आमदार सभागृहात अनुपस्थितीत राहिले होते यावरून हे सिद्ध होत आहे की, विरोधकांना कुमारस्वामी यांचे सरकार पाडण्याची घाई झाली आहे. आता याबाबत उद्या काय निर्णय होईल ते पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.