Maharashtra Cabinet Expansion: मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांची पुन्हा दिल्ली वारी! मंत्रीमंडळ विस्तारासंबंधी होणार मोठा निर्णय
Devendra Fadnavis And Eknath Shinde (Photo Credit - Twitter)

राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आज पुन्हा दिल्ली (Delhi) दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यात ते गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांची भेट घेण्याची शक्यता आहे. तसेच महाराष्ट्रच्या मंत्रीमंडळाच्या विस्ताराचा (Maharashtra Cabinet Expansion) मुहूर्त दिल्ली दरबारी ठरणार अशी चर्चा आहे. सध्या राज्यातील सर्व खाते मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्रीचं बघत आहेत. सरकार स्थापन होऊन आज 22 दिवस झालेत तरी राज्यातील शिंदे गटासह भाजपतील (BJP) आमदार मंत्रीमंडळ विस्ताराच्या प्रतिक्षेत आहेत. संबंधित घडामोडीचा वेध लक्षात घेता उद्याच मंत्रीमंडळाचा विस्तार होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

 

महाविकास आघाडी सरकार (Maha Vikas Aghadi) विरुध्द बंड पुकारत बंडखोर शिवसेनेतील शिंदे गट आणि भाजपने राज्यात सत्ता स्थापन केली. त्यामुळे उद्या होणाऱ्या संभाव्य मंत्रिमंडळ विस्तारात भाजपचे दोन तृतीयांश मंत्री  तर उर्वरित मंत्रिपदे शिंदे गटातील आमदारांना मिळतील, अशी चर्चा आहे. भाजपकडून मंत्रिपदाची शपथ घेणाऱ्या नेत्यांमध्ये प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil), सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar), राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrishna Vikhe Patil), गिरीश महाजन (Girish Mahajan), जयकुमार रावल (Jaikumar Rawal) आणि आशिष शेलार (Ashish Shelar) या ज्येष्ठ नेत्यांचा समावेश असणार आहे. तर शिंदे गटातील उदय सामंत (Uday Samant), गुलाबराव पाटील (Gulabrao Patil), दादा भुसे (Dada Bhuse), संदीपान भुमरे (Sandipan Bhumare) यांच्यासह अन्य काही नेते मंत्री पदाची शपथ अशी माहिती आहे. (हे ही वाचा:-Deepak Kesarkar: तुम्ही अजून लहान आहात, प्रादेशिक अस्मिता काय असते तुम्हाला कल्पना नाही; दिपक केसरकरांचा आदित्य ठाकरेंना टोला)

 

सत्ता स्थापन झाल्यानंतर पहिल्या आठवड्यातच मंत्रिमंडळ विस्तार होणे अपेक्षित होतं परंतु तीन आठवडे झाले तरी विस्तार झालेला नाही यावरुन विरोधकांकडून शिंदे फडणवीस सरकारवर मोठी टीका होताना दिसत आहे.  त्यामुळे मंत्रिमंडळ विस्तारात नेमकी अडचण काय? असा सवाल उपस्थित होत आहे. तरी आजच्या या दिल्ली वारी नंतर मंत्रीमंडळ विस्ताराचं मुहूर्त कधीचा ठरतो हे बघणं महत्वाचं ठरणार आहे.