Lok Sabha Election Results 2019: 'सिंधिया', 'पवार' घराण्याने यंदा पहिल्यांदा अनुभवला लोकसभा निवडणूकीत राजकीय पराभव
Scindia & Pawar family (Photo Credits: Facebook)

लोकसभा निवडणूक निकाल 2019 (Lok Sabha Election Result) मध्ये भाजप आणि त्यांच्या मित्रपक्षांनी मिळून 350 चा टप्पा पार करत यंदा संसदेमध्ये स्पष्ट बहुमत मिळवले आहे. देशासह महाराष्ट्रामध्ये एनडीएच्या बाजूने मतदारांनी कौल दिला आहे. त्यामुळे इतर पक्षांचे महाराष्ट्रासह देशात पानिपत झालं आहे. महाराष्ट्रात शरद पवारांच्या (Sharad Pawar) घराण्याला तर मध्य प्रदेशामध्ये 'सिंधिया' (Scindia) घराण्याला निवडणूकीत राजकीय पराभवाचा सामना करावा लागला आहे. यंदा भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर पहिल्यांदाच लोकसभेमध्ये 'सिंधिया' घरातील व्यक्तीचा समावेश नसेल.

2019 च्या लोकसभा निवडणूक निकालामध्ये ज्योतिरादित्य सिंधिया यांचा पराभव झाला आहे. मध्य प्रदेशातील गुना लोकसभा मतदारसंघातून भाजपचे उमेदवार डॉ. कृष्ण पाल सिंह यांनी ज्योतिरादित्य सिंधिया यांना तब्बल 1.25 लाख मतांनी हरवले आहे. त्यामुळे हा पराभव यंदाच्या निवडणूक निकालांमधील एका मोठ्या पराभवांपैकी एक समजला जात आहे.

सिंधिया घराण्यातील राजकीय कारकीर्द

ज्योतिरादित्य सिंधिया यांच्या घराण्याला मोठी राजकीय परंपरा आहे. 1957 सालपासून सिंधिया घराण्यातील व्यक्ती संसदेमध्ये निवडून गेले आहेत. 1957 ते 67 या दहा वर्षांच्या काळात विजयाराजे शिंदे निवडून गेल्या होत्या. 1989 ते 1999 दरम्यानच्या दोन लोकसभा टर्ममध्येही त्या निवडून आल्या होत्या. 1971 ते 1984 या काळात माधवराव शिंदे निवडून आले होते. 1984 ते 1999 पर्यंत ग्वाल्हेर, पुन्हा 1999 साली गुना येथील निवडणूक त्यांनी जिंकली. 2002 ते 2019 या काळात ज्योतिरादित्य सिंधिया निवडून आले. मात्र यंदा झालेल्या लोकसभा निवडणूकीमध्ये ज्योतिरादित्य सिंधिया यांना पराभवाचा सामना करावा लागला आहे. त्यामुळे सिंधिया घराण्याचा विजयरथ रोखला आहे.

सिंधिया घराण्याप्रमाणेच 'पवार' कुटुंबीयाला देखील महाराष्ट्रात धक्का बसला आहे. शरद पवारांचा नातू आणि अजित पवार यांचा मुलगा पार्थ पवारचा मावळ लोकसभा मतदारसंघातून पराभव झाला आहे. त्यामुळे शरद पवार यांच्या कुटूंबाला पहिल्यांदा निवडणूकीत राजकीय पराभवाचा सामना करावा लागला आहे.