लोकसभा निवडणूक 2019 (Lok Sabha Election 2019) निकाल यायला अवघ्या काही तासांचाच अवधी बाकी असताना राज्याच्या राजकीय वर्तुळात वेगवान घडामोडींना वेग आला आहे. बीड जिल्ह्यात या वेगाने अत्युच्च टोक गाठले आहे. बीड जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) पक्षाला नेते आणि माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर (Jaydutt Kshirsagar) यांच्या रुपाने जोरदार हादरा बसण्याची शक्यता आहे. राष्ट्रवादीचे नेते जयदत्त क्षिरसागर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला सोडचिठ्ठी देत शिवसेनेत प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे. प्राप्त माहितीनुसार क्षिरसागर यांचा आज (मंगळवार, 22 एप्रिल 2019) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या उपस्थितीत शिवसेना (Shiv Sena) प्रवेश होणार आहे.
जयदत्त क्षीरसागर यांच्या संभाव्य शिवसेना प्रवेशाला विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते आणि राष्ट्रवादीचे बीडमधील नेते धनंजय मुंडे यांच्यातील संघर्षाचजी पार्श्वभूमी आहे. गेले काही काळ हा संघर्ष अधिक तीव्र होत गेला. या संघर्षातून क्षीरसागर हे मुंडे यांच्यावर नाराज होते. या नाराजीतूनच त्यांनी लोकसभा निवडणुकीत भाजपला मदत केली. क्षीरसागर यांचे लोकसभा निवडणुकीतील राजकीय वर्तन पाहता ते भाजपमध्ये जातील अशी अटकळ होती. मात्र, प्रदीर्घ काळापर्यंत क्षीरसागर यांनी भाजप की शिवसेना नेमका कोणत्या पक्षात प्रवेश? याबाबत मौन बाळगले होते. (हेही वाचा, राष्ट्रवादी काँग्रेस आमदार जयदत्त क्षीरसागर यांची उद्धव ठाकरे यांच्यासोबत 'मतोश्री'वर भेट; धनंजय मुंडे यांना बीडमध्ये धक्का)
एएनआय ट्विट
Jaydutt Kshirsagar, NCP leader and former Maharashtra Minister, to join Shiv Sena today
— ANI (@ANI) May 22, 2019
दरम्यान, क्षीरसागर यांनी अखेर शिवसेनेत जाण्याचा निर्णय घेतला. क्षीरसागर यांनी राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी देण्याचा निर्णय काही दिवसांपूर्वीच केला होता. आपल्या कार्यकर्त्यांसोबत घेतलेल्या एका बैठकीत क्षीरसागर यांनी धनंजय मुंडे यांच्यावर सडकून टीका केली होती. या बैठकीत क्षीरसागर यांनी वापरलेले 'मागच्या दरातून आलेले, घर फोडणारे, गुंडगिरी करणारे यांना धडा शिकवा,' हे शब्द बीडच्या राजकारणात चर्चेचा विषय ठरले होते.