Imtiaz Jalil | (PC - Facebook)

गेल्या आठवड्यात मंत्रिमंडळ बैठकीत एक मोठा निर्णय घेण्यात आला. किंबहूना त्या निर्णयाला महाविकास आघाडी सरकारचा शेवटचा मोठा निर्णय असे म्हणायला ही हरकत नाही. औरंगाबाद शहराचं नाव संभाजीनगर करावं ही शिवसेनेची जुनी मागणीला होती. या मागणीवर महाविकास आघाडी सरकारने शिक्का मोर्तब केला असुन औरंगाबादचे नामांतर संभाजीनगर असे करण्यात आले आहे. पण ठाकरे सरकारच्या या निर्णयाच्या स्वागतापेक्षा अधिक निंदा झाली. औरंगाबाद म्हणजेच संभाजीनगरचे खा. इम्तियाज जलील  यांनी देखील या नामांतरावर आपली प्रतिक्रीया दिलेली आहे.

 

औरंगाबादच्या नामांतरचा निर्णय अत्यंत घाईघाईने घेण्यात आला आहे. नामांतराचा हा निर्णय छत्रपती संभाजीराजांचं नाव जपण्यासाठी नाही तर मुख्यमंत्री पदाची खुर्ची वाचवण्यासाठी घेण्यात आला आहे, असा खोचक टोला एआयएमआयएमचे खा. इम्तियाज जलील यांनी माजी मुख्यमंत्री उध्दव ठाकरेंना लगावला आहे. तसेच औरंगाबादचा प्रत्येक नागरिक आता औरंगाबाद या नावाशी जोडला गेला आहे. हिंदू असो वा मुस्लीम कुणालाही औरंगाबादचं नामांतर व्हावं असं वाटत नाही. या नामांतराविरुध्द आम्ही लढा देण्यास सज्ज आहोत; कोर्टात जावू, हा प्रश्न संसदेत मांडू पण औरंगाबादचं हे नामांतर आम्हाला मान्य नाही असं मत खा. इम्तियाज जलील यांनी मांडल आहे.

 

 

गेल्या अनेक दशकांपासून औरंगाबाद शहराचे नामांतर व्हावे अशी मागणी शिवसेना, भाजप आणि हिंदुत्त्ववादी संघटनेकडून करण्यात येत होती. या मागणीला वेळोवेळी काँग्रेस आणि राष्ट्रवादी पक्षाच्या नेत्यांकडून विरोध करण्यात आला. मात्र, माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी औरंगाबाद आणि उस्मानाबाद शहराच्या नामकरणाच्या प्रस्तावाला गेल्या आठवड्यात मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरी दिली. या निर्णयाचं हिंदू बांधवाकडून स्वागत करण्यात आलं मात्र हा निर्णय फक्त मुख्यमंत्री पद वाचवण्यासाठी उध्दव ठाकरेंनी घेतला अशी टीका ही त्यांच्यावर करण्यात आली.