भाजप अध्यक्ष अमित शाह, मुख्यमंत्री फडणवीस यांच्यात मॅरेथॉन चर्चा, शिवसेनेसोबत जाहीर वाद टाळण्यावर एकमत?
शिवसेनेसोबत जाहीर वाद न करण्यावर भाजपमध्ये एकमत? | (Photo courtesy: Archived, Edited Images)

आगामी सार्वत्रिक निवडणुकांना (2019) सामोरे जायचे तर मित्र पक्षांना सोबत घेण्यावाचून पर्याय नाही. त्यामुळे मित्रपक्षांशी दुरावलेले संबंध पुन्हा प्रस्थापित करण्यासाठी भाजपच्या वरिष्ठ गोटातून हालचाली सुरु असल्याचे वृत्त आहे. दरम्यान, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Chief Minister Devendra) आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह (BJP party chief Amit Shah) यांच्यात सह्याद्री अथितीगृहावर काल रात्री (मंगळवार, 18 डिसेंबर) उशीरा एक बैठक पार पडली. या बैठकीतही मित्रपक्षांसोबत संबंध न दुरावण्यावर एकमत झाले. सुमारे अडीच तास चाललेल्या या बैठकीत महाराष्ट्रात शिवसेनेसोबत (Shiv Sena)जाहीर वाद टाळण्यावर केंद्रातील आणि राज्यातील नेत्यांनी एकवाक्यता दाखवल्याची सूत्रांची माहिती आहे.

सन 2014 मध्ये पार पडलेल्या लोकसभा, विधानसभा निवडणुकीतील विजयानंतर भाजपचा आत्मविश्वास चांगलाच वाढला. त्यानंतर झालेल्या अनेक निवडणुकांमध्ये दमदार यश मिळाल्यामुळे भाजपचा आत्मविश्वास अधिकच दुणावला. त्यातूनत सरकार चालवताना आणि निर्णय घेताना मित्रपक्ष आणि इतर घटकांना गृहीत धरले जाऊ लागले. मात्र, मध्य प्रदेश, छत्तीसगड आणि राजस्थान या राज्यांमध्ये नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत पराभव झाला आणि भाजच्या वाढलेल्या आत्मविश्वासाच्या फुग्याला टाचणी लागली. मध्य प्रदेश, राजस्थान छत्तीसगड या राज्यांतील निवडणुकीतील पराभव म्हणजे 2019मध्ये होणाऱ्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी भाजपला मिळालेला धोक्याचा इशारा असल्याचे खुद्द भाजपच्याच गोटातून बोलले जाऊ लागले आहे. त्यामुळे भाजपच्या केंद्रीय गोटातून डॅमेज कंट्रोल करण्यासाठी प्रयत्न सुरु असल्याचे समजते.

भाजप अध्यक्ष अमित शाह आणि मुख्यमंत्री फडणवीस यांच्यातील प्रदीर्घ चर्चा हाही या डॅमेज कंट्रोलचाच भाग असल्याची आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या महाराष्ट्र दौऱ्यानंतर लगेचच अमित शाहा यांनी केलेला मुंबई दौरा हा भविष्यातील राजकीय रणनितीसाठी महत्त्वपूर्ण मानला जात आहे. नुकत्याच पार पडलेल्या मध्य प्रदेश, छत्तीसगड, राजस्थान, तेलंगणा आणि मिझोराम या पाचौकी एकाही राज्यात भाजपला सत्ता राखता आली नाही. त्यामुळे या इतिहासाची पुनरावृत्ती टाळण्यासाठी भाजप पुन्हा जोमाने कामाला लागल्याचे पाहायला मिळत आहे. (हेही वाचा, भाजपमध्ये खळबळ! मोदींना हटवा, गडकरींना पाठवा; शेतकरी नेत्याची आरएसएसकडे मागणी)

दरम्यान, अमित शाह आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात चाललेल्या बैठकीवेळी केंद्रीय रेल्वेमंत्री पियुष गोयल, आशिष शेलार यांच्यासह आणखीही कारी महत्त्वाचे नेते उपस्थित होते. या नेत्यांनी स्नेहभोजनाचाही अस्वाद घेतला. दरम्यान, पाच राज्यांमध्ये झालेल्या पराभवावर या बैठकीत चिंतन झाले. तसेच, यापूढे शिवसेनेसोबत किमान सध्या तरी जाहीर वाद टाळावेत आणि सामोपचाराने तोडगा काढावा याबाबतही या बैठकीत चर्चा करण्यात आली. आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमिवरही विभागवार चर्चा या वेळी झाली.