Gujarat: पोलिसांचे काम चोरांना पकडून तुरुंगात टाकणे हे आहे. पण पोलिसच चोर झाले तरी जनतेच्या मालमत्तेची सुरक्षितता धोक्यात आहे. पोलिसचं चोर बनल्याची घटना गुजरातमधील महिसागर जिल्ह्यात घडली आहे. पोलिसांनी एका पोलीस ठाण्यातून सुमारे 2 लाख रुपयांची दारू आणि पंखे चोरले. हे प्रकरण उघडकीस आल्यानंतर एएसआय, हेड कॉन्स्टेबलसह 5 पोलिसांना अटक करण्यात आली आहे.
काय आहे संपूर्ण प्रकरण?
गुजरातमधील महिसागर जिल्ह्यातील एका पोलिस ठाण्यातून जप्त केलेल्या 1.97 लाख रुपयांच्या दारूच्या बाटल्या आणि पंखे चोरल्याप्रकरणी एका ASIसह पाच पोलिसांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. खानापूर तालुक्यातील बकोर पोलीस ठाण्यातील लॉकअपमध्ये दारूच्या बाटल्या व पंखे ठेवण्यात आले होते. (हेही वाचा - Rajastan Accident: PM Modiच्या सभेला ड्युटीसाठी निघालेल्या पाच पोलिस कर्मचाऱ्यांचा दुर्दैवी मृत्यू,३ जखमी,राजस्थान येथील घटना)
पोलीस उपअधीक्षक पी.एस.वळवी यांनी सांगितलं की, बाकोर पोलिसांनी एका व्यक्तीकडून 482 दारूच्या बाटल्या आणि 75 टेबल फॅन जप्त केले. आरोपी व्यक्ती पंख्याच्या बॉक्समध्ये लपवून गुजरातमध्ये दारू तस्करी करण्याचा प्रयत्न करत होता. पोलिस ठाण्यातील कर्मचाऱ्यांनी या बाटल्या आमि टेबल फॅन लंपास केले.
लॉकअपची साफसफाई करताना IMFL च्या बाटल्या आणि पंख्यांचे रिकाम्या आणि तुटलेले बॉक्स सापडले. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, ASI अरविंद खांत, हेड कॉन्स्टेबल ललित परमार आणि इतर तीन पोलिसांना भारतीय दंड संहितेच्या कलम 380 (चोरी) आणि इतर संबंधित गुन्ह्याखाली अटक करण्यात आली आहे. या प्रकरणातील सहावा आरोपी फरार असून तो स्थानिक व्यक्ती असून त्याने आरोपी पोलिसांना मदत केली.