PNB Scam Case: नीरव मोदी स्कॉटलँड यार्ड पोलिसांच्या जाळ्यात कसा अडकला? घ्या जाणून
नीरव मोदी (Photo Credit-Twitter @The Telegraph)

PNB Scam Case: पंजाब नॅशनल बँकेला (PNB) कोट्यवधी रुपयांचा चुना लाऊन देशाबाहेर पळालेला हिरे व्यापारी नीरव मोदी (Nirav Modi) पोलिसांच्या जाळ्या सापडला. स्कॉटलँड यार्ड पोलीस (Scotland Yard Polic) आणि लंडन (London) येथील मेट्रो बँक (Metro Bank in London) कर्मचारी यांच्या सतर्कतेमुळे त्याला अटक झाली. इतका दिवस पोलिसांना गुंगारा देणार नीरव मोदी अचानक कसा काय पोलिसांच्या जाळ्यात सापडला असा प्रश्न त्याच्या अटकेनंतर चर्चेत आला. या प्रश्नाचे उत्तर आता पुढे आले आहे. जाणून घ्या नीरव मोदी कसा लागला पोलिसांच्या हाती.

प्रसारमाध्यमांनी नीरव मोदी याच्या अटकेबाबत दिलेल्या वृत्तानुसार, नीरव मोदी हा लंडनस्थित मेट्रो बँक कार्यालयात गेला होता. आपल्या गोरखधंद्यामुळे नीरव मोदी प्रसारमाध्यमांमधुन जगभर प्रसिद्ध झालाच होता. त्यामुळे खाते उघडण्यासाठी बँकेत गेलेल्या नीरव मोदी याला तेथील एका कर्मचाऱ्यांने ओळखले. या कर्मचाऱ्याने प्रसंगावधान दाखवत पोलीसांना खबर दिली. पुढच्या काही मिनिटांतच स्कॉटलँड यार्ड पोलिसांचे एक पथक तिथे पोहोचले. त्यांनी नीरव मोदीला अटक केली. भारतातील बँकेला गंडा घालून देशाबाहेर पळालेला नीरव मोदी अखेर लंडन येथे बँकेत सापडला. टाइम्स ऑफ इंडियाने याबाबत वृत्त दिले आहे. (हेही वाचा, PNB Scam चा आरोपी नीरव मोदी याला 29 मार्चपर्यंत कोठडी; लंडनमध्ये कोर्टात जामीन नाकारला)

नीरव मोदी आणि मेहुल चोक्सी या जोडगोळीने पंजाब नॅशनल बँकेला तब्बल 13 हजरा 500 कोटी रुपयांचा गंडा घातला. या दोघांनी मिळून देशात अनेक बनावट कंपन्या स्थापन केल्या. या कंपन्यांचे आपन संचालक आहोत असे दर्शवत त्यांनी बँकांची फसवणूक केली. हा घोटाळा उघड होणार अशी कुणकूण लागताच नीरव मोदी आणि मेहुल चोक्सी हे दोघेही आपापल्या कुटुंबासोबत देशाबाहेर पळाले. देशाबाहेर पळाल्यापासून नीरव मोदीचे दर्शन घडले नव्हते. मात्र, लंडन येथील एका वृत्तपत्राने नीरव मोदी याचा छडा लावला आणि देशाबाहेर पळाल्यानंतर नीरव मोदी पहिल्यांदाच कॅमेऱ्यात कैद झाला. या वेळी विचारलेल्या प्रश्नांना नीरव मोदी याने उत्तरे देणे टाळले. तो तोंड लपवून पळाला.