येत्या दोन महिन्यात लोकसभेच्या निवडणुका पार पडणार आहेत. या पार्श्वभूमीवर 1 फेब्रुवारी रोजी सादर होणाऱ्या नव्या अर्थसंकल्पा (budget 2019) बाबत सर्वांनाच उत्सुकता आहे. या अर्थसंकल्पाबाबत अनेक तर्क वितर्क लढवले जात होते, सध्याचे सरकार पूर्ण अर्थसंकल्प मांडून संसदेची परंपरा मोडणार असे बोलले जात होते. मात्र आता या तर्कांवर पूर्णपणे पडदा पडला आहे. यावर्षीचा अर्थसंकल्प हा अंतरिमच असणार असल्याचे रेल्वेमंत्री पियुष गोयल यांनी स्पष्ट केले आहे. येत्या एक फेब्रुवारीला केंद्र सरकार पुढील आर्थिक वर्षाच्या पहिल्या चार महिन्यांसाठीचा अंतरिम अर्थसंकल्प लोकसभेत सादर करणार आहे.
Finance Ministry clarifies that this budget will be 'Interim Budget 2019-20'. pic.twitter.com/jr3mQhlGQ7
— ANI (@ANI) January 30, 2019
एक फेब्रुवारीला रेल्वेमंत्री पियुष गोयल हे लोकसभेमध्ये अंतरिम अर्थसंकल्प सादर करणार आहेत. या अर्थसंकल्पात सामान्य नागरिक, शेतकरी, नोकरदार यांच्यासाठी मोठ्या सवलती जाहीर करण्यात येण्याची शक्यता वर्तविली जात आहे. त्याचबरोबर करमुक्त उत्पन्नाची मर्यादा पाच लाखांपर्यंत वाढविण्यात येण्याची शक्यताही वर्तविण्यात येत आहे. त्यामुळे हा अर्थसंकल्प सर्वसामान्यांना दिलासादायक ठरणार आहे. वित्तमंत्री अरुण जेटली हे वैद्यकीय उपचारांसाठी सध्या न्यूयॉर्कमध्ये आहेत. त्यामुळे अर्थमंत्रालयाचे प्रभारी म्हणून पीयूष गोयल काम पाहत आहेत. (हेही वाचा : Budget 2019 : मोदी सरकारकडून मध्यमवर्गीयांना मिळू शकते ही भेट; जाणून घ्या काय असेल अर्थसंकल्पाचे वैशिष्ठ्य)
दरम्यान, संपूर्ण आर्थिक वर्षासाठी सरकारची मुदत असेल तर पूर्ण अर्थसंकल्प सादर केला जातो. मात्र यावर्षी सध्याच्या सरकारची मुदत ही मे 2019 पर्यंत आहे. त्यामुळे आता अंतरिम अर्थसंकल्प सादर केला जाईल, व निवडणुकानंतर नव्याने येणारे सरकार उर्वरीत महिन्यांसाठी नव्याने अर्थसंकल्प सादर करेल.