पेट्रोल-डीजल (Photo Credits: Getty)

देशात कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस झपाट्याने वाढ होऊ लागली आहे. कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन भारतात लॉकडाउनचा (Lockdown) तिसरा टप्पा सुरु करण्यात आला आहे. यामुळे येत्या 17 मेपर्यंत अत्यावश्यक वस्तू वगळता सर्वकाही बंद ठेवण्यात आले आहे. लॉकडाउनचा कालावधी वाढवण्यात आला असला तरी रेड, ऑरेंज आणि ग्रीनझोनुसार काही भागात लॉकडाउनचे नियम शिथिल करण्यात आले आहेत. लॉकडाऊनचे नियम शिथिल केल्यानंतर मात्र पेट्रोल आणि डिझेलच्या दरात (Petrol And Diesel Prices) वाढ झाली आहे. राजधानी दिल्लीमध्ये (Delhi) पेट्रोलच्या दरांत वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे आता पुन्हा सर्वसामान्य जनतेच्या खिशाला कात्री लागणार आहे.

देशाची राजधानी दिल्लीमध्ये पेट्रोल-डिझेल आणखी महाग झाले आहे. दिल्ली सरकारने वाहनांच्या इंधनावरील व्हॅट करामध्ये वाढ केली आहे. दिल्ली शहरात प्रतिलिटर पेट्रोल 1.67 रुपये तर डिझेलच्या किंमतीत प्रतिलिटर 7.10 रुपयांनी वाढ केली आहे. दिल्लीत ग्राहकांना आता प्रतिलिटर पेट्रोलसाठी 71.26 रुपये आणि डिझेलसाठी 69.39 रुपये मोजावे लागणार आहेत. देशात तिसऱ्या टप्प्याच्या लॉकडाउनच्या दुसऱ्यादिवशी म्हणजे 4 मेपासून ही दरवाढ करण्यात आली आहे. तिसऱ्या टप्प्यात निर्बंध काही प्रमाणात शिथील करण्यात आले आहेत. त्यामुळे व्यापार-व्यवसाय वाढणार आहे. प्रतिलिटर पेट्रोलमध्ये उत्पादन शुल्क कराचे 22.98 रुपये आणि व्हॅटचा वाटा 16.44 रुपये आहे. तेच डिझेलवर उत्पादन शुल्क कर 18.83 रुपये आणि व्हॅट 16.26 रुपये आहे. लॉकडाउनमुळे अर्थचक्र ठप्प असल्याने सर्व राज्यांच्या तिजोरीमध्ये ख़डखडाट आहे. अशा परिस्थितीत सर्वच राज्यांची पेट्रोल-डिझेल विक्रीवर महसूलाची भिस्त आहे. हे देखील वाचा- Coronavirus: लॉक डाऊनमुळे परदेशात अडकलेल्या भारतीयांना मायदेशी आणण्याची प्रक्रिया सुरु; 7 मे पासून विविध टप्प्यात भारतात आणले जाईल

कोरोना विषाणूने संपूर्ण भारतातच हाहाकार माजवला आहे. दिल्ली येथे कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 4 हजार 898 पोहचली आहे. यापैकी 64 लोकांचा मृत्यू झाला आहे. तर, 1 हजार 431 जणांना कोरोनावर मात केली आहे. तसेच दिल्लीत हळूहळू कोरोनाबाधितांच्या संख्येत घट होत असल्याचे समजत आहे.