पाकिस्तानी सैन्याचा LOC ओलांडून भ्याड हल्ला, एक जवान शहीद
(Photo Credit: PTI)

आज सकाळी, जम्मू-काश्मीर (Jammu & Kashmir) मधील राजौरी (Rajouri) जिल्ह्यातील नौशेरा (Naushera) सेक्टरमध्ये नियंत्रण रेषेवर (LOC) पाकिस्तानी सैन्याने तुफान गोळीबार केला. यात लान्स नाईक संदीप थापा नामक एक भारतीय जवान शहीद झाल्याचे समजत आहे. जवान थापा (वय 35) हे देहरादूनचे (Deharadun) असून, १५ वर्षांपासून ते लष्करी सेवेत होते. दरम्यान, पाकिस्तान कडून शनिवारी सकाळी साडेसहा वाजता सुरू झालेला गोळीबार दुपारपर्यंत सुरु होता.

कलम 370 हटवल्यानंतर सैरभैर झालेल्या पाकिस्तानकडून गेल्या काही दिवसांपासून वारंवार LOC चे उल्लंघन करण्यात येत आहे. याच पार्श्वभूमीवर 'पाकिस्तान कडून आज सकाळी साधारण साडेसहा वाजता शस्त्रसंधीचं उल्लंघन करण्यात आलं. गोळीबार आणि तोफांचा मारा करणाऱ्या पाकिस्तानी सैन्याला भारतीय जवानांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं. ही चकमक अद्याप सुरू आहे,' अशी माहिती भारतीय लष्कराकडून देण्यात आली.

ANI ट्विट

दरम्यान, पाकिस्तानने भारतासोबतचे राजनैतिक व व्यवसायिक संबंध तोडले आहेत. दोन्ही देशातील व्यापार रेल्वे आणि बस सेवा बंद केली आहे. तसेच भारताच्या पाकिस्तानातील राजदूतांना परत पाठवले आहेत. तर भारतातही पाकिस्तानी कलाकारांना बॅन करण्याची मागणी केली जात आहे.