व्हिडीओ : देशाचे रक्षण करणाऱ्या जवानांनी अशी साजरी केली दिवाळी, भारत-पाकने एकमेकांना दिली मिठाई
आईटीबीपी चे जवान (Photo Credits: ANI)

देशाचे संरक्षण करण्यासाठी आपल्या प्राणांची आहुती देण्यास सदैव तत्पर असणाऱ्या वीर जवानांनीदेखील एका वेगळ्या अंदाजात दिवाळी साजरी केली. सीमेवर देशाचे रक्षण करण्यासाठी चोवीस तास सतर्क राहणारे जवान भलेही दिवाळीला आपल्या परिवारापासून लांब असोत, मात्र बॉर्डरवर दिवाळी साजरी करण्याचा मोह त्यांनादेखील आवरता आला नाही.

सोशल मिडियावर प्रसारित करण्यात आलेल्या एका व्हिडीओमध्ये दिसत आहे की, बीएसएफच्या जवानांनी वाघा-अटारी बॉर्डरवर मोठ्या आनंदाने हा दिवाळीचा उत्सव साजरा केला. आपल्या आप्तस्वकीयांपासून इतक्या लांब असलेल्या जवानांनी एकमेकांसोबत साजरी केलेली ही दिवाळी पाहून तुमच्याही ओठावर हास्याची लकेर उमटल्याशिवाय राहणार नाही. हा व्हिडीओमध्ये जवान फुलबाजे उडवताना तसेच ढोलकीच्या थापेवर नाचताना दिसत आहेत.

याचसोबत लदाखच्या दुर्गम परिसरात, जिथे तापमान शून्यापेक्षाही कमी असते अशा जागेवर इंडो-तिबेटीयन बॉर्डर पोलिस (आईटीबीपी)च्या जवानांनीही मोठ्या धुमधडाक्यात दिवाळी साजरी केली. चारही बाजूंनी होणाऱ्या बर्फवृष्टीमध्ये दिव्यांच्या प्रकाशात या जवानांनी दिवाळी सणाला ‘यादगार’ बनवले. यातच आता पंतप्रधान नरेंद्र मोदीदेखील केदारनाथाच्या दर्शनानंतर ही दिवाळी भारत-चीन सीमेवरील जवानांसोबत साजरी करणार आहेत.

दरम्यान भारत आणि पाकिस्तानच्या सैनिकांनी दिवाळीच्या पूर्व संध्येला मंगळवारी, जम्मू-कश्मीरच्या पुंछ जिल्ह्यातील एलओसीवर एकमेकांना मिठाई देऊन, शुभेच्छा देऊन दिवाळी साजरी केली. भलेही दोन्ही देशांमध्ये कितीही तणाव असू दे, मात्र या सणाच्या माध्यमातूनच हे दोन्ही देश एकत्र येतात म्हणूनही या सणाचे महत्व अधिक आहे.

.