प्रातिनिधिक प्रतिमा (Photo Credits: Facebook//UIDAI)

देशातील 50 करोड मोबाईल धारकांचा नंबर बंद होणार असल्याची खबर वाऱ्यासारखी सोशल मिडियावर व्हायरल झाली, आणि या बातमीमुळे सगळीकडे एकच खळबळ माजली. या वृत्तानुसार ज्या मोबाईल युजर्सनी नवीन सिम कार्ड घेताना आधार कार्डशिवाय इतर कोणतेही ओळखपत्र दिले नाही, अशा युजर्सचा मोबाईल नंबर बंद होणार होता. या बातमीनंतर अनेकांनी सोशल मिडियावर पोस्ट करून याबाबत आपला निषेध व्यक्त केला. मात्र आता आधार कार्डमुळे मोबाईल फोन नंबर बंद होणार नाहीत, असे आश्वासन टेलीकॉम विभाग आणि युनिक आयडेंटिफिकेशन ऑथॉरिटी ऑफ इंडिया(यूआयडीएआय)ने दिले आहे. तसेच ही बातमी पूर्णतः चुकीची असल्याची पुष्ठीही देण्यात आली आहे.

असे सांगितले जात होते की, आधार व्हेरिफिकेशनमार्फत जे सिम कार्ड्स घेतले गेले आहेत, त्यांच्या ओळख प्रक्रियेसाठी इतर कोणत्यातरी ओळखपत्राचा बॅकअप द्यावा लागणार आहे. जर असे झाले नाही तर तुमचे सीम कार्ड डिसकनेक्ट होईल.

काही दिवसांपूर्वी आधारबाबतीत सुप्रीम कोर्टात पार पडलेल्या सुनावणीमध्ये, ‘मोबाईल कंपन्या नवीन नंबरसाठी ओळखपत्र म्हणून आधार कार्डचा उपयोग करू शकणार नाहीत’ असे सांगितले होते. मात्र या निर्णयाआधी आधार कार्डचा वापर करून घेतलेल्या सिम कार्ड्स धारकांचा डेटा मोबाईल कंपन्यांकडे आहे. अशा डेटाचे काय करायचे हा प्रश्न देखील समोर होता, त्यामुळे आधार ऐवजी इतर ओळखपत्र सादर केले गेले नाही, तर हे नंबर बंद होतील अशी अफवा पसरली होती. मात्र आता नव्या केवायसीसाठी आवश्यक पुरावे सादर करायचे किंवा नाही याचा निर्णय सर्वस्वी ग्राहकांवर असणार आहे असे यूआयडीएआय, आधार प्राधिकरणाने स्पष्ट केले आहे.

याबाबतीत, ‘सरकारला या गोष्टीची काळजी असून त्यावर उपाय शोधण्याचे प्रयत्न चालू आहेत. आधार हटवून त्याऐवजी नवे ओळखपत्र जमा करेपर्यंत मोबाईल धारकांना कोणतीही अडचण येऊ नये, यासाठी सरकार प्रयत्नशील आहे. कमीत कमी अडचणींसह हे प्रकरण कसे निकाली काढता येईल, याचा सरकार विचार करत आहे. असे टेलीकॉम सचिव अरुणा सुंदरराजन म्हणाल्या.