Prabir Purkayastha (PC - ANI)

NewsClick Case: न्यूजक्लिकचे संस्थापक प्रबीर पुरकायस्थ (Prabir Purkayastha) आणि एचआर प्रमुख अमित चक्रवर्ती यांना 1 डिसेंबरपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. दिल्लीतील एका न्यायालयाने गुरुवारी हा निर्णय दिला. या दोघांविरुद्ध यूएपीए कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चीनच्या समर्थनार्थ प्रचार करण्यासाठी पैसे मिळाल्याचा त्यांच्यावर आरोप करण्यात आला आहे. दोघांनाही विशेष न्यायाधीश हरदीप कौर यांच्यासमोर हजर करण्यात आले. त्यांच्या पोलिस कोठडीची मुदत आज संपत होती. दोघांना 25 ऑक्टोबर रोजी पोलिस कोठडी सुनावण्यात आली होती. त्यानंतर त्यांना 3 ऑक्टोबरला अटक करण्यात आली होती.

दरम्यान, प्रबीर पुरकायस्थ यांनी पोलिसांनी जप्त केलेली इलेक्ट्रॉनिक उपकरणे परत करण्यासाठी अर्ज दाखल केला आहे. विशेष न्यायाधीश हरदीप कौर यांनी शुक्रवारी दिल्ली पोलिसांना चक्रवर्तीच्या जामीन अर्जावर 4 नोव्हेंबरपर्यंत उत्तर दाखल करण्यास सांगितले. एचआर प्रमुख अमित चक्रवर्ती यांनीही पटियाला हाऊस कोर्टात जामीन याचिका दाखल केली आहे. (हेही वाचा - NewsClick च्या माजी कर्मचाऱ्याच्या केरळमधील निवासस्थानावर छापा; दिल्ली पोलिसांकडून फोन आणि लॅपटॉप जप्त)

काय आहे नेमकं प्रकरण?

एफआयआरनुसार, भारताच्या सार्वभौमत्वाला बाधा आणण्यासाठी आणि देशाविरुद्ध असंतोष निर्माण करण्यासाठी चीनकडून या न्यूज पोर्टलला मोठ्या प्रमाणात निधी आला होता. 2019 च्या लोकसभा निवडणुकीदरम्यान निवडणूक प्रक्रियेत गोंधळ उडवण्यासाठी पुरकायस्थने - पीपल्स अलायन्स फॉर डेमोक्रसी अँड सेक्युलॅरिझम (PADS) - या गटाशी कट रचल्याचा आरोप देखील करण्यात आला आहे. एफआयआरमध्ये नाव असलेल्या संशयितांवर आणि डेटाच्या विश्लेषणात समोर आलेल्या संशयितांवर 3 ऑक्टोबर रोजी दिल्लीतील 88 आणि इतर राज्यांमध्ये सात ठिकाणी छापे टाकण्यात आले होते.