YES Bank खातेदारांसाठी आनंदवार्ता! बँकेच्या सर्व सेवा 18 मार्च पासून होणार पुर्ववत
Yes Bank (Photo Credits: File Photo)

आर्थिक संकटात सापडलेल्या येस बँकेवर रिझर्व्ह बँकेने निर्बंध लादले होते. त्यामुळे येस बँकेच्या अनेक सेवा ठप्प करण्यात आल्या होत्या. मात्र 18 मार्च रोजी संध्याकाळी 6 वाजल्यापासून बँकेच्या सर्व सेवा पूर्ववत होणार असल्याची माहिती देणारे परीपत्रक येस बँकेने जारी केले आहे. त्याचबरोबर येस बँकेने आपल्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरुन ट्विट करत ही माहिती आपल्या ग्राहकांना दिली आहे. त्यामुळे 19 मार्चपासून ग्राहक येस बँकेच्या 1,132 शाखांपैकी कोणत्याही शाखेला भेट देऊ शकतात.

बँकेच्या सेवा पुर्ववत होणार असल्याचे ट्विट येस बँकेने केले आहे. आम्ही आमच्या बँकेच्या सर्व सेवा बुधवार, 18 मार्च 2020 रोजी संध्याकाळी 6 वाजल्यापासून सुरु करत आहोत. त्यामुळे 19 मार्चपासून तुम्ही आमच्या 1,132 शाखांपैकी कोणत्याही शाखेत जावून बँकींग सेवांचा लाभ घेऊ शकता. तसंच सर्व डिजिटल प्लॅटफॉर्म्स सुरळीत कार्यरत असून त्याद्वारेही ग्राहक आर्थिक व्यवहार करु शकतात, अशी माहिती ट्विटद्वारे देण्यात आली आहे. (YES Bank Case: अनिल अंबानी यांच्या समोरील अडचणी वाढल्या; ED कडून समन्स जारी)

Yes Bank Tweet:

येस बँकेची सातत्याने ढासळत जाणारी आर्थिक स्थिती पाहता रिझर्व्ह बँकेने 5 मार्च ते 3 एप्रिल या काळासाठी बँकेवर निर्बंध लागू केले होते. त्यानुसार खातेदारांना बँकेतून महिन्याभरात केवळ 50000 रुपये काढता येणार होते. मात्र येस बँकेवरील आर्थिक संकट दूर करण्यासाठी एसबीआय 7,250 कोटी रुपयांची गुंतवणूक करणार असून ICICI आणि HDFC बँका 1,000 कोटी गुंतवणार आहेत. तर एक्सिस बँक, कोटक महिंद्रा बँक, बंधन बँक आणि फेडरल बँक अनुक्रमे 600, 500 आणि 300 कोटी रुपयांची गुंतवणूक करणार आहेत.