आधी कोरोना आणि नंतर युक्रेन-रशिया युद्ध यामुळे जगात अनेक देशामध्ये महागाईचा आलेख वाढता आहे. भारतातही मागील काही दिवसांत महागाई नवनवे विक्रम मोडत असल्याचे समोर आले आहे. काही दिवसांपूर्वी किरकोळ महागाईने (Spike in WPI Inflation) 8 वर्षातील उच्चांक गाठल्याच समोर आले होते. आजही सरकारने दिलेल्या माहितीनुसार देशात घाऊक महागाईचा दर 9 वर्षातील उच्चांकी पातळीवर आहे.
सरकारी आकडेवारीनुसार, भारतामध्ये एप्रिल महिन्यात महागाईचा दर 15.08% आहे. हाच दर मार्च महिन्यात 14.55% होता. तर वर्षभरापूर्वी एप्रिल महिन्यात घाऊक महागाईचा दर 10.74% होता. त्यामुळे सध्या वाढत असलेली महागाई गोर गरीब आणि सामान्यांचं आयुष्य बिकट करत आहे. हे देखील नक्की वाचा: Inflation Rate Update: महागाई दराने गाठला मागील 8 वर्षांमधील उच्चांक; अन्नधान्य महागाईचा दर 8.38% .
दरम्यान इंधन आणि ऊर्जा घाऊक महागाई दर 34.52 टक्क्यांवरुन 38.66 टक्के तर अन्न धान्य महागाई दर 8.71 टक्क्यांवरुन 8.88 टक्के झाला आहे. डिपार्टमेंट ऑफ प्रमोशन ऑफ इंडस्ट्री अँड इंटरनल ट्रेड ने आज आकडेवारी जाहीर करताना तेल आणि इंधनाच्या किमती वाढल्यामुळे यंदा एप्रिल महिन्यामध्ये घाऊक महागाई वाढल्याचं म्हटलं आहे.
एप्रिल 2022 हा घाऊक महागाईचा दर 10 टक्क्यांच्या वर असल्याचा सलग 13 वा महिना आहे. वाढत्या महागाईमुळे आरबीआय ने या महिन्याच्या सुरुवातीला एमपीसीची बैठक घेऊन रेपो दरात अचानक वाढ जाहीर केली आहे. रिझव्र्ह बँकेने रेपो दरात 0.40 टक्क्यांची वाढ करताना हे स्पष्ट संकेत दिले होते की, येत्या काही महिन्यांत महागाईच्या वाढत्या दरांमधून सामान्यांची सुटका होण्याची शक्यता अत्यंत कमी आहे.
अन्नधान्य, तेल, इंधन, भाज्या, गॅस या सार्यांचेच भाव एकापाठोपाठ एक वाढले असल्याने आता सामान्यांचं आर्थिक गणित बिघडलं आहे. गृहिणींना घराचं बजेट मांडणं कठीण होऊन बसलं आहे.