कोरोना व्हायरसच्या वाढत्या संकटात जागतिक बँकेकडून भारताला 1 बिलियन डॉलर्सचे संरक्षण पॅकेज जाहीर
World Bank (Photo Credits: Wikimedia.org)

कोरोना व्हायरसच्या संकटात जागतिक बँकेने भारताला तब्बल 1 बिलियन डॉलरचे संरक्षण पॅकेज जाहीर केले आहे. भारतामधील कोरोना व्हायरसच्या वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर हे पॅकेज जाहीर करण्यात आले आहे. एप्रिल महिन्यात जागतिक बँकेने जगातील विविध देशांना कोरोना व्हायरस संकटात मदत करण्यासाठी 160 बिलियन डॉलर्सच्या योजनेस मान्यता दिली होती. पुढील 15 महिन्यांमध्ये ओढावणाऱ्या आपत्तकालीन परिस्थितीचा सामना करण्यासाठी या रक्कमेची तरतूद करण्यात आली आहे.

जागतिक बँकेचे भारत देशाचे डिरेक्टर जुनैद अहमद यांनी असे म्हटले की, "सोशल डिस्टसिंगमुळे भारताची अर्थव्यवस्था मंदावली आहे. दरम्यान, भारत सरकार देशभरातील गरिब आणि गरजू लोकांच्या सुरक्षेसाठी गरिब कल्याण योजनेवर अधिक भर देत आहे. त्यामुळे आर्थिक दरी कमी करण्यास आणि अर्थव्यवस्था पूर्वपदावर आणण्यास मदत होईल."

भारतातील कोरोना बाधितांचा आकडा 80000 पार गेला आहे. आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, मागील 24 तासांत भारतात 3,967 नव्या रुग्णांची भर पडली असून 100 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे भारतातील कोरोनाग्रस्तांची संख्या 81,970 वर पोहचली असून एकूण 2,649 रुग्णांचा बळी गेला आहे. (Coronavirus: पैसेच नाहीत! कोरोना व्हायरस विरोधात कसा लढणार पाकिस्तान? जागतिक बँकेला मागितले कर्ज)

ANI Tweet:

जागतिक बँकेच्या आपत्कालीन मदतीचा सर्वाधिक फायदा भारताला मिळेल असे जागतिक बँकेकडून यापूर्वीच सांगण्यात आले होते. त्यानुसार भारताला 1 बिलियन डॉलरची मदत देण्यात येणार असून पाकिस्तान आणि अफगाणिस्तान यांना अनुक्रमे 200 आणि 100 मिलियन डॉलरची मदत मिळणार आहे. असे असले तरी जवळपास सर्व खंडातील देशांना जागतिक बँकेची मदत पोहचणार आहे. कोरोना व्हायरसच्या संकटातून उभारण्यासाठी खाजगी कंपन्यांना इंटरनॅशनल फायनान्स कॉर्पोरेशनकडून 8 बिलियन डॉलरची मदत करण्यात येणार आहे. यामुळे संबंधित कंपनीतील नोकऱ्या सुरक्षित राहतील.