तामिळनाडूमधील 21 वर्षीय महिलेने तिच्यावर बलात्कार करण्याचा प्रयत्न करणाऱ्या पुरुषाला दगडाने मारल्याची घटना घडली आहे. या दरम्यान, बलात्काराचा प्रयत्न करणाऱ्या 40 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. ही घटना तिरुवल्लूरच्या मिंजूर भागातील आहे. पोलिसांनी महिलेविरोधात आईपीसी कलम 100 (आत्मरक्षणाचा अधिकार) अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. तसेच त्या महिलेला सोडून देण्यात आले आहे. मिंजूर पोलिसांना एका माशाच्या शेताजवळ एकाचा मृतदेह सापडला होता. मृतदेह ताब्यात घेतल्यानंतर पोलिसांनी सीआरपीसीच्या कलम 174 अंतर्गत संशयास्पद मृत्यूचा गुन्हा दाखल केला होता. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही महिला दोन मुलांची आई आहे. जेव्हा ती शेतात काम करीत होती, तेव्हा त्या माणसाने तिला घेरले आणि तिला एका निर्जन ठिकाणी घेऊन गेला आणि तिच्यावर बलात्कार करण्याचा प्रयत्न केला. (Jharkhand: धक्कादायक! 65 वर्षीय वृद्धाचे तोंड शिवून, हातपाय बांधून रेल्वे रुळावर फेकून दिले; पत्नी व मुलाचे कृत्य असल्याचा आरोप)
या महिलेचे म्हणणे आहे की, बलात्कार टाळण्यासाठी तिने आरोपी व्यक्तीला जमिनीवर ढकलले. यानंतर तिने त्याला दगडाने मारले. दगडाच्या सहाय्याने मारल्यावर तो तिथेच बेशुद्ध झाला. त्या महिलेने त्याला शेताबाहेर खेचून आणले आणि रस्त्यावर फेकले. घटनेनंतर महिलेने आपल्या 26 वर्षीय पतीला सांगितले. महिलेचा नवरा जवळच काम करत होता तो तिथे आला. नंतर ज्या ठिकाणी महिलेने त्या व्यक्तीला टाकले होते तेथे इतर कामगारही पोहोचले.
या दरम्यान काही स्थानिक ग्रामस्थही तेथे पोहोचले आणि घटनेची माहिती मिळताच मिंजूर पोलिसांची टीम ही घटनास्थळी पोहोचली. त्यांनी '108' रुग्णवाहिकेला कॉल केली. त्या व्यक्तीला रुग्णालयात नेण्यात आले, तेथे डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. पोलिसांनी संशयास्पद मृत्यूचा गुन्हा दाखल करून मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पोन्नेरी जीएच येथे पाठविला. या प्रकरणाची सत्यता समजल्यानंतर महिलेवर आयपीसीच्या कलम 100 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असल्याचे तिरुवल्लूरचे एसपी व्ही. वरुण कुमार यांनी सांगितले. त्यानंतर त्या महिलेला सोडून देण्यात आले.