महिलांना तंत्र-मंत्राच्या जाळ्यात अडकवून त्यांच्यावर बलात्कार (Rape) करणाऱ्या आणखी एका बाबाला न्यायालयाने दोषी ठरवले आहे. हा बलात्कारी बाबा 'जलेबी बाबा' (Jalebi Baba) म्हणून प्रसिद्ध आहे. चार वर्षांपूर्वी हरियाणातील फतेहाबाद जिल्ह्यातील टोहाना येथून पोलिसांनी त्याला अटक केली होती. जलेबी बाबावर तब्बल 120 वेगवेगळ्या अल्पवयीन मुली आणि महिलांवर बलात्कार करून अश्लील व्हिडिओ बनवल्याचा आरोप होता. पोलिसांच्या छाप्यात 120 महिलांशी संबंध प्रस्थापित करतानाचे व्हिडिओ सापडले आहेत.
जलेबी बाबाचे खरे नाव अमरपुरी उर्फ बिल्लू आहे. एकेकाळी तो रस्त्यावर जिलेबी विकायचा. त्यानंतर हळूहळू त्याने स्वतःला बाबा घोषित करायला सुरुवात केली. लोकांच्या समस्या तंत्र-मंत्राच्या माध्यमातून दूर करण्याचा दावा तो करू लागला. हळू हळू त्याची प्रसिद्धी वाढू लागली व त्यानंतर त्याने टोहानामध्ये आपला आश्रम बांधला, ज्याला त्याने अमपरुरी आश्रम असे नाव दिले. बाबाच्या अनुयायांमध्ये महिलांचा समावेश जास्त होता.
जलेबी बाबाने आश्रमात तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलांची फसवणूक सुरु झाली. महिलांना दारू पाजून तो बलात्कार करायचा. तो महिलांचे न्यूड व्हिडीओ बनवून तिला ब्लॅकमेल करायचा आणि पैशांची मागणी करायचा. जलेबी बाबा बराच काळ हा घाणेरडा व्यवसाय चालवत होता. बलात्कारी बाबा इतका धूर्त होता की तो आपल्या सोबत पिस्तूलही ठेवायचा. महिलांना खोलीत नेऊन बलात्कार केल्यानंतर तो त्यांना पिस्तुल दाखवून जीवे मारण्याची धमकी देत असे. तो स्मशानभूमीत जाऊन पूजेच्या नावाखाली बाबा भोंदूगिरी करायचा, त्यामुळे आजूबाजूचे लोकही त्याला घाबरायचे. (हेही वाचा: Gujrat Shocker: पत्नीच्या त्रासाला कंटाळून 11 वर्षाच्या मुलाची हत्या करत पतीने केली आत्महत्या)
या दरम्यान, दोन महिलांनी त्याचे कृत्य उघड करत पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. त्यांनी पोलिसांना बाबाच्या सर्व कृत्याची माहिती दिली होती. दुसरीकडे, जुलै 2018 मध्ये एक व्हिडिओ व्हायरल झाला होता ज्यात जलेबी बाबा उर्फ अमरपुरी एका महिलेसोबत शारीरिक संबंध ठेवताना दिसला होता. हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आली. त्याच्या अड्ड्याची झडती घेतली असता, तेथून अश्लील व्हिडीओ आणि मादक पदार्थ जप्त करण्यात आले. या प्रकरणी पोलिसांनी 200 पानांचे आरोपपत्र न्यायालयात दाखल केले होते. या खटल्याची सुनावणी करताना न्यायालयाने अमरपुरी उर्फ जलेबी बाबा याला 5 जानेवारीला दोषी ठरवून 10 जानेवारी शिक्षेची तारीख निश्चित केली आहे.