डेमोक्रॅटचे उमेदवार जो बिडेन (Joe Biden) यांनी अमेरिकेच्या अध्यक्षीय निवडणुकीत विजय मिळविला असून, जानेवारीत ते राष्ट्रपतीपदाची शपथ घेतील. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) आणि जो बिडेन यांच्यात होणाऱ्या संभाषणाविषयीही, चर्चेविषयी सध्या शक्यता बांधल्या जात आहेत. जो बिडेन आणि पीएम मोदी हे एकमेकांशी कधी संभाषण साधतील याबाबत प्रश्न उपस्थित होत आहेत. आता परराष्ट्र मंत्रालयाने स्पष्ट केले आहे की, पंतप्रधान मोदींनी 8 नोव्हेंबर रोजी ट्विट करत बिडेन यांना शुभेच्छा दिल्या होत्या. राहता राहिला प्रश्न दोन्ही नेत्यांमधील परस्परसंवादाचा, तर तो दोघांच्याही सोयीस्कर वेळीनुसार घडेल. विदेश मंत्रालयाचे प्रवक्ते अनुराग श्रीवास्तव यांनी हे सांगितले.
पुढील अमेरिकन प्रशासनातील संबंधांच्या भविष्याबद्दल श्रीवास्तव म्हणाले की, दोन्ही देशांमधील संबंधांचा पाया खूप मजबूत आहे आणि दोन्ही देशांमधील या व्यापक जागतिक रणनीती भागीदारीला अमेरिकेत दोन्ही पक्षांचा पाठींबा आहे. अमेरिकेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत बिडेन यांनी विद्यमान राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पराभव केल्याच्या काही दिवसानंतर मंत्रालयाची ही टिप्पणी दिली आहे. श्रीवास्तव यांनी ऑनलाईन मिडिया ब्रीफिंगमध्ये असेही सांगितले की, पंतप्रधान मोदींनी असे म्हटले आहे की, ते भारत-अमेरिका संबंधांना नवीन उंचीवर नेण्यासाठी जो बिडेन यांच्यासोबत काम करण्यास उत्सुक आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जो बिडेन यांना अमेरिकेचे 46 वे राष्ट्रपती म्हणून निवडून आल्यावर ट्वीट केले होते, 'जो बिडेन यांचे भव्य विजयाबद्दल अभिनंदन! उपराष्ट्रपती म्हणून भारत-अमेरिका संबंध मजबूत करण्यामध्ये आपले योगदान महत्त्वपूर्ण आणि अमूल्य होते. भारत-अमेरिका संबंध अधिक उंचीवर नेण्यासाठी मी पुन्हा एकदा तुमच्यासोबत काम करण्याची आशा बाळगतो.’ (हेही वाचा: Rahul Gandhi On PM Modi:भारताची ताकद मोदींच्या कमजोरीत बदलली आहे- राहुल गांधी)
दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सप्टेंबर 2014 मध्ये जेव्हा अमेरिकेचा दौरा केला होता, तेव्हा तत्कालीन उपराष्ट्रपती बिडेन यांनी त्यांच्यासाठी मेजवानी दिली होती. बराक ओबामा यांच्या कार्यकाळात भारत आणि अमेरिका यांच्यात राजनैतिक आणि संरक्षण संबंधात मोठा विस्तार झाला होता आणि त्यामध्ये बिडेन यांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती.