![](https://mrst1.latestly.com/wp-content/uploads/2020/03/Police-during-lockdown-in-Patna-380x214.jpg)
कोरोना व्हायरसचा (Coronavirus) सामना करण्यासाठी सध्या संपूर्ण देशात 21 दिवसांचा लॉक डाऊन जाहीर करण्यात आला आहे. अशावेळी लोक कामाव्यतिरिक्त घरातून बाहेर पडत नाही ना यावर पोलीस लक्ष ठेऊन आहेत. असे कोणी आढळलेच तर पोलिसांकडून अशा व्यक्तीचा चांगलाच समाचार घेतला जात आहे. अशात या लॉकडाऊनमध्ये पश्चिम बंगालमधील (West Bengal) हावडा (Howrah) शहरातील, एका 32 वर्षीय लाल स्वामी नावाच्या व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. बुधवारी संचारबंदी असताना हा तरुण दूध घेण्यासाठी बाहेर गेला होता, मात्र त्यामुळे पोलिसांनी केलेल्या मारहाणीत त्याचा मृत्यू झाला असल्याचा आरोप त्याच्या कुटुंबीयांनी केला आहे.
पोलिसांनी हा आरोप नाकारला असून, या तरुणाच्या मृत्यूचे कारण हृदयविकाराचा झटका असल्याचे म्हटले आहे. या तरुणाच्या कुटुंबाने दिलेल्या माहितीनुसार, लॉक डाऊनच्या काळात लाल स्वामी आपल्या मुलांसाठी दूध घेण्यासाठी घराबाहेर पडला होता. दरम्यान, लोकांचा जमाव हटवताना पोलिसांनी त्याला पकडले. त्यानंतर पोलिसांनी त्याला इतके मारले की तो जमिनीवर कोसळला. अशा जखमी अवस्थेत त्याला तातडीने रुग्णालयात नेण्यात आले आणि तेथेच काही काळानंतर त्याचा मृत्यू झाला. (हेही वाचा: केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची मोठी घोषणा; भारतातील सर्व टोल प्लाझावरील टोल वसुलीस तात्पुरती स्थगिती)
मात्र पोलिसांचे म्हणणे आहे की, त्याचा मृत्यू पोलिसांच्या मारहाणीतून नव्हे तर हृदयविकाराच्या झटक्याने झाला. पोलिसांच्या मारहाणीमुळे मृत्यूची माहिती मिळताच अनेक लोक घराबाहेर पडले. त्यानंतर त्यांनी आंदोलन सुरू केले आणि निषेध करत घोषणाबाजी केली. पोलिस ठाण्याला घेराव घालण्यासाठी आलेल्या लोकांचा प्रयत्न नात्र अयशस्वी ठरला. प्रशासन व लोकप्रतिनिधींनी संतापलेल्या लोकांना शांत केले. दरम्यान, लॉकडाऊनमध्ये पोलिसांसोबत झालेल्या वादाचे, त्यांनी केलेल्या मारहाणीचे अनेक व्हिडिओ अनेक ठिकाणांहून समोर येत आहेत, ज्यामुळे आता पोलिसांच्या मनोवृत्तीवर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे.