Uttarakhand Forest Fire News: उत्तराखंडमध्ये जंगलाला भीषण आग, 33.34 हेक्टरवरील झाडे जळून खाक

उत्तराखंडच्या नैनिताल, हल्दवानी आणि रामनगरच्या लगतच्या जंगलांमध्ये मोठा वणवा लागल्यामुळे अनेक झाडे जळून खाक झाली आहे.  उत्तराखंडमधील जंगलात शनिवारी लागलेले वणवे नियंत्रणात आणण्याचे काम रविवारी दुसऱ्या दिवशीही सुरू होते. भारतीय हवाई दलाच्या मदतीने अनेक भागांमधील वणव्यांवर नियंत्रण मिळविले असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. वणव्यांमुळे आतापर्यंत 33.34 हेक्टरवरील झाडे जळून खाक झाली आहेत.

पाहा व्हिडिओ -

नैनिताल, हल्दवानी आणि रामनगर या गावांच्या लगतच्या जंगलांमध्ये वणव्यांचे स्वरूप तीव्र होते. त्यामुळे हवाई दल आणि अग्निशमन दलाच्या जवानांनी याच भागावर अधिक लक्ष केंद्रित केले होते. शनिवारपासून सुरू असलेल्या प्रयत्नांमुळे आज आगीवर नियंत्रण मिळविण्यात यश आले असले तरीही काही भागांमध्ये अद्याप वणवे धुमसत आहेत. नरेंद्रनगर वनविभागाअंतर्गत येणाऱ्या माणिकनाथ डोंगररांगेत पेटलेले वणवे पूर्णपणे नियंत्रणात आणण्यात आले.

दरम्यान नैनिताल आणि लगतच्या जंगलातील वणव्यांवर बहुतांशी नियंत्रण मिळविले आहे, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. मुख्यमंत्री पुष्करसिंह धामी यांनीही या भागाची हवाई पाहणी केली. अग्निशमन दलाच्या मदतीसाठी हवाई दलाने एमआय-17 व्ही-5 हेलिकॉप्टर तैनात केले असून लष्कर आणि प्रांतीय रक्षक दलाचे जवानही मदतकार्यात सहभगी आहेत. जंगलांच्या लगतच्या गावांमधील नागरिकांना जंगलांपासून दूर राहण्याची सूचना करण्यात आली आहे. तसेच, नव्याने वणवा पेटल्याचे निदर्शनास येताच वनविभागाला तातडीने कळविण्याचे आवाहनही करण्यात आले आहे.