Image Used for Representational Purpose Only | (Photo Credits: ANI)

उत्तर प्रदेशमधील (Uttar Pradesh) पीलीभीतमधून (Pilibhit) एक धक्कादायक प्रकरण समोर आले आहे. येथे भात गिरणीत काम करणाऱ्या काही तरुणांनी कंप्रेसरच्या सहाय्याने तिथेच काम करणाऱ्या एका अल्पवयीन मुलाच्या प्रायव्हेट पार्टद्वारे पोटात हवा भरली. त्यानंतर तो मुलगा बेशुद्ध पडला, त्याचे पोट फुगले. तातडीने त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले जेथे उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. रुग्णवाहिकेतून रुग्णालयात जात असताना या अल्पवयीन मुलीने त्याच्याबरोबर घडलेल्या घटनेबाबत तसेच आरोपींची नावेही सांगितली. या प्रकरणात आरोपी युवकास पोलिसांनी अटक केली आहे तर अन्य दोन फरार आहेत. पोलिस त्यांचा शोध घेत आहेत.

ही घटना पीलीभीतच्या पूरनपूर कोतवालीच्या गुरुनानक राईस मिलमध्ये घडली आहे. 4 मार्च रोजी इयत्ता 9 वीचा एक अल्पवयीन विद्यार्थी येथे कामावर गेला होता. घरातील खर्चाला हातभार लावण्यासाठी वडिलांच्या जागी तो कामावर गेला. तिथेच गावातील इतर 3 तरुणही काम करत होते. दुपारचे जेवण झाल्यावर लोकांमध्ये चेष्टामस्करी सुरु झाली. यावेळी, दोन जणांनी अल्पवयीन मुलाला पकडले आणि तिसऱ्या मुलाने खासगी भागाद्वारे कंप्रेसरने आत हवा भरली. यानंतर, या मुलाचे पोट फुगू लागले व त्याची प्रकृती खालावू लागली. ताबडतोब त्याला बरेली येथील खासगी रुग्णालयात नेण्यात आले, जिथे आतडी फाटल्याने त्याचा मृत्यू झाला. (हेही वाचा:  भारतात दररोज लैंगिक अत्याचार होत असलेल्या 4 मुलांना न्याय मिळत नाही; KSCF च्या अहवालात धक्कादायक खुलासा)

मुलाचे वडील घनश्याम यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी गिरणी कामगार अमित, सूरज आणि कमलेश यांच्याविरूद्ध गुन्हा दाखल केला. सोमवारी पोलिसांनी कमलेशला पकडले, तिथून त्याला न्यायालयात हजर करण्यात आले. कोर्टाने त्याला तुरूंगात पाठविले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, इतर दोन आरोपींचा शोध घेण्यात येत आहे.