उत्तर प्रदेश: TikTok चा व्हिडिओ बनवताना अचानक बंदुकीतून गोळी सुटल्याने तरुणाचा मृत्यू
TikTok App (Photo Credits- Twitter)

उत्तर प्रदेशातील हाफिजगंज येथे टिकटॉकचा व्हिडिओ बनवताना अचानक बंदुकीतून गोळी सुटल्याने तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. तरुणाच्या आईने असे म्हटले आहे की, त्याने व्हिडिओ बनवण्यासाठी त्याने परवाना असलेली पिस्तुल काढली. मात्र खोलीतून गोळीचा आवाज आल्याने तेथे धाव घेतली असता तेथे मुलाचा मृत्यू दिसून आला. परिवाराने तरुणाचे शवविच्छेदन करण्यास नकार दिला आहे. एवढेच नाही तर पोलिसांना मुलाचा मृतदेह घेऊन जाण्यास सुद्धा दिले नाही. सोमवारी रात्री वडिल कामावरुन आले असता त्याच्यावर अंतिमसंस्कार करण्यात आले.

प्राप्त झालेल्या माहितीनुसार, मुडिया भीकमपुर स्थित सैनिक कर्मचारी वीरेंद्र कुमार यांना रुकडी येथे तैनात करण्यात आले होते. गावात बायको आणि दोन मुले राहतात. तर 18 वर्षीय मुलाने त्याच्या आईला व्हिडिओ बनवण्यासाठी पिस्तुल घेत असल्याचे सांगितले. त्यावेळी महिलेने त्याला पिस्तुक कपाटातून काढून दिली. त्यानंतर मुलगा पिस्तुल घेऊन खोलीत गेल्यानंतर काही वेळाने पिस्तुलातील गोळी सुटल्याचा जोरात आवाज आला. त्यावेळी त्याच्या कानाला गोळी लागल्याचे महिलेने पाहिले.(Tik Tok चा आणखीन एक बळी, व्हिडीओ बनवताना चुकून गोळी चालवली गेल्याने अल्पवयीन मुलाचा मृत्यू)

या प्रकारानंतर तातडीने मुलाला रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र उपचारापूर्वीच डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. या प्रकरणी पोलिसांकडून अधिक तपास केला जात आहे. मात्र पोलिसांनी पिस्तुल ताब्यात न घेता तसेच घटनास्थळावरुन निघून गेले असल्याचे सांगण्यात आले आहे.