उत्तर प्रदेशमध्ये (Uttar Pradesh) एका 38 वर्षीय महिलेला तिच्या 5 वर्षाच्या पुतण्याला मारहाण करून त्याची हत्या केल्याप्रकरणी अटक करण्यात आली आहे. मुलाने शौच करून बिछाना खराब केल्याने त्याची काकू चिडली होती. तिचा राग इतक्या टोकाला पोहोचला की या शुल्लक कारणावरून तिने चक्क आपल्या पुतण्याला मारून टाकले. ही घटना रविवारी घडली. सोमवारी पोलिसांना मुलगा यश प्रताप हा आपले काका शैलेंद्रसिंग यांच्या घरातून बेपत्ता झाल्याची तक्रार मिळाली होती. पोलिसांना सांगण्यात आले होते की, यश प्रताप आपली काकू नीरजबरोबर जत्रेतून हरवला आहे.
याप्रकरणी अपहरणाची एफआयआर नोंदविण्यात आली. पोलिसांनी जत्रेचे फुटेज शोधण्यास सुरुवात केली पण नीरजसह कोणताही मुलगा आढळला नाही. एटा जिल्ह्यात राहणारे यशचे वडील ब्रिजेंद्र सिंह यांनी सांगितले की, यशची काकू नीरजने 7 फेब्रुवारी रोजी मुलगा हरवल्याचे सांगितले होते. त्यानंतर तिने आपले निवेदन बदलले व सांगितले की, यशने बिछाना खराब केल्याने आपण त्याला घरातून बाहेर काढून दरवाजा लाऊन घेतला होता, मात्र नंतर जेव्हा दरवाजा उघडला तेव्हा तो बाहेर नव्हता.
सीसीटीव्ही फुटेज आणि महिलेचे बदललेले विधान पाहून पोलिस संशय आला. चौकशी दरम्यान शेवटी तिने गुन्ह्याची कबुली दिली. त्यानंतर ती पोलिसांना आपले 65 वर्षीय वडिला राम बहादूरच्या मदतीने यशचा मृतदेह जिथे पुरला होता, त्याठिकाणी घेऊन गेली. नीरजच्या वडिलांनाही मंगळवारी अटक करण्यात आली. (हेही वाचा: फोटो पाठवले नाहीस तर हाताची नस कापण्याची इन्स्टाग्रामवरील मित्राकडून धमकी, १७ वर्षीय मुलीला न्यूड फोटो पाठवण्यासाठी केले ब्लॅकमेल)
पोलिस अधीक्षक (एसपी) फरूरखाबाद, अशोक कुमार मीना यांनी सांगितले की, चौकशी दरम्यान नीरजने पोलिसांना सांगितले की पुतण्याला मारहाण करुन ठार मारल्यानंतर तिने आपल्या वडिलांना घटनेची माहिती दिली. नीरजच्या घरापासून 60 किमी अंतरावर राहणाऱ्या राम बहादुर यांनी तिला मृतदेह कंपला येथे आणण्याचा सल्ला दिला. नंतर नीरज एका काळ्या बॅगमध्ये मृतदेह घालून तो एका ऑटोमधून वडिलांकडे घेऊन गेली. तिने वडिलांच्या मदतीने मुलाचा मृतदेह जंगलात खोल खड्ड्यात पुरून टाकला. कलम 302 (खून), 201 (गुन्ह्याचे पुरावे गायब करणे) आणि आयपीसी कलम 120 बी (गुन्हेगारी कट रचणे) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आले आहेत.