Uttar Pradesh: 27 वर्षांपूर्वी झाला बलात्कार; मुलाने वडिलांचे नाव विचारल्यावर महिलेने दोघांविरुद्ध दाखल केली तक्रार
Representational Image (Photo Credits: Pixabay)

उत्तर प्रदेशच्या (Uttar Pradesh) शाहजहांपूर (Shahjahanpur) येथे 12 व्या वर्षी बलात्कार (Rape) झालेल्या पीडित मुलीने घटनेच्या 27 वर्षानंतर कोर्टाच्या आदेशानुसार आरोपीविरूद्ध पोलिसांकडे तक्रार नोंदवली आहे. बलात्काराच्या घटनेनंतर मुलगी गर्भवती राहिली व पुढे तिने एका मुलाला जन्म दिला. आता मुलगा मोठा झाल्यानंतर त्याने त्याच्या वडिलांचे नाव जाणून घेण्याचा प्रयत्न केला, त्यानंतर महिलेने पोलिसांत बलात्काराची तक्रार दाखल केली. पोलिस अधीक्षक (शहर) संजय कुमार यांनी शनिवारी सांगितले की, सुमारे 27 वर्षांपूर्वी ही पीडिता शाहजहांपूर येथे आपली बहिण आणि मेहुणे यांच्या घरी राहत होती. यावेळी त्याच भागात राहणाऱ्या नकी हसनने एक दिवस घरात घुसून मुलीवर बलात्कार केला.

महिलेने दिलेल्या तक्रारीच्या आधारे पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितले की, हसननंतर त्याचा धाकटा भाऊ गुड्डू यानेही मुलीवर बलात्कार केला. आरोपीने तिच्यावर अनेक वेळा बलात्कार केल्याचा आरोप पीडितेने केला आहे. कुमार म्हणाले की त्यावेळी पीडितेचे वय 12 वर्षे होते. या महिलेने आपल्या तक्रारीत म्हटले आहे की वयाच्या 13 व्या वर्षी ती गरोदर राहिली होती आणि 1994 मध्ये तिने मुलाला जन्म दिला होता. नंतर शाहाबाद भागातील उधमपूर गावातल्या एका व्यक्तीने या मुलाला दत्तक घेतले.

दरम्यान, पीडितेच्या मेहुण्याची रामपूर जिल्ह्यात बदली झाली आणि ही मुलगीही त्यांच्यासोबत गेली. पुढे मेहुण्याने किशोरवयीन मुलीचे लग्न गाझीपूर जिल्ह्यातील एका व्यक्तीशी लावून दिले. परंतु दहा वर्षानंतर तिच्या बलात्काराच्या घटनेची माहिती मिळताच तिच्या पतीने तिला घटस्फोट दिला. यानंतर ती महिला तिच्या गावी राहू लागली. या दरम्यान महिलेचा मुलगा मोठा झाला आणि त्याला त्याचा आई-वडिलांविषयी जाणून घ्यायचे होते. मुलाला आईची माहिती मिळताच त्याने तिची भेट घेतली. यावेळी आईने सर्व हकीकत मुलाला सांगितली. (हेही वाचा: लज्जास्पद! विम्याचे पैसे मिळवण्यासाठी मेरठ येथील पतीकडून बायकोची हत्या)

आता या महिलेच्या तक्रारीवरून सदर बाजार पोलिस ठाण्यात दोन जणांविरूद्ध सामूहिक बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कुमार म्हणाले की, पोलिस संपूर्ण प्रकरणाचा तपास करत आहेत आणि पीडित मुलाची डीएनए चाचणी केली जाईल. पोलिसांनी महिलेच्या तक्रारीकडे दुर्लक्ष केल्यानंतर तिने न्यायालयात धाव घेतली होती.