उत्तर प्रदेशातील (Uttar Pradesh) अलीगढ जिल्ह्यात एका अल्पवयीन मुलीवर बलात्काराची (Rape) धक्कादायक घटना समोर आली आहे. इथे मानलेल्या पित्याने गेल्या दोन वर्षांपासून 10 वर्षांच्या निष्पाप मुलीवर बलात्कार केला आहे. काही दिवसांपूर्वी आरोपीच्या सुनेने या मुलीवर अत्याचार होताना पाहिले होते. यानंतर तिने या प्रकरणाची पोलिसात तक्रार केली, मात्र कोणतीही कारवाई झाली नाही. त्यानंतर भाजप नेत्याच्या तक्रारीनंतर पोलिसांनी आरोपीविरुद्ध पॉक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, अलीगढच्या क्वार्सी पोलीस स्टेशन परिसरात राहणाऱ्या पप्पूने सुमारे सात वर्षांपूर्वी पीडितेला एका भट्टीवरून घरी आणले होते. पीडितेचे म्हणणे आहे की, तिचे आई-वडील त्याच भट्टीवर काम करायचे. आरोपीने मुलीचे पालनपोषण करण्यासाठी तिला घरी आणले होते. ही मुलगी पप्पूला वडील मानत होती. जेव्हा ही मुलगी 8 वर्षांची झाली तेव्हा पप्पूची तिच्याकडे पाहण्याची नजर बदलली आणि त्याने तिच्यावर लैंगिक अत्याचार करण्यास सुरुवात केली.
पीडितेने आरोप केला आहे की, आरोपी पप्पूने दिला ही गोष्ट गुप्त ठेवण्यासाठी अनेकवेळा जीवे मारण्याची धमकी दिली होती. भाजप युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष धरमवीर सिंह लोधी आणि उपाध्यक्ष सौरभ चौधरी यांचे म्हणणे आहे की, पोलिसांना या संपूर्ण प्रकरणाची माहिती होती, मात्र तरी त्यांनी कोणतीही कारवाई केली नाही. चौकीच्या प्रभारींनी महिला कॉन्स्टेबलच्या उपस्थितीशिवाय मुलीला चौकशीसाठी बोलावल्याचा आरोप त्यांनी केला आहे. (हेही वाचा: Digital Rape Case: सहा वर्षाच्या मुलीसोबत 'डिजिटल रेप', नराधमास अटक)
धरमवीर सिंह लोधी यांनी सांगितले की, त्यांनी शुक्रवारी (28 ऑक्टोबर 2022) उच्च अधिकाऱ्यांकडे आरोपीवर कारवाई करण्याची मागणी केली. त्यानंतर त्यांच्या आदेशावरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पीडित तरुणी आणि तिच्या वाहिनीच्या संमतीने हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी इन्स्पेक्टर पंकज कुमार मिश्रा सांगतात की, आरोपी पप्पूविरुद्ध पॉक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पीडित मुलीची वैद्यकीय तपासणी करण्यात आली आहे, आता कलम 164 अंतर्गत जबाब घेण्यात येणार आहेत. त्यानंतर पुढील कारवाई केली जाईल.