Representational Image | (Photo Credits: PTI)

उत्तर प्रदेशातील  (Uttar Pradesh) मेरठ (Meerut) जिल्ह्यातील सदर पोलिस स्टेशन परिसरातून एक खळबळजनक घटना समोर आली आहे. येथे एका खासगी शाळेच्या ऑपरेटरने शाळेच्या शौचालयात (School’s Washrooms) सीसीटीव्ही कॅमेरे बसवले होते, त्याद्वारे शाळेतील शिक्षकांचे आक्षेपार्ह फोटो व व्हिडिओ यांचे चित्रीकरण करण्यात आले आहे. याबाबत जवळजवळ 52 पीडित शिक्षिकांनी आरोपीविरोधात तक्रार दाखल केली. त्यानंतर बुधवारी हे आरोपी, शिक्षिकांना धमकावण्यासाठी त्यांच्या घरीही पोहोचले होते. पीडित शिक्षिकांच्या तक्रारीवरून पोलिसांनी संध्याकाळी उशिरा आरोपींना अटक केली. हे फोटो व व्हिडिओ यांचा वापर करून शिक्षकांना पगाराविना काम करण्यासाठी ब्लॅकमेल केले जात होते.

गेले अनेक महिने हा प्रकार सुरु होता. आता या शिक्षिकांनी केलेल्या तक्रारीवरून व्यवस्थापकीय समितीचे सचिव आणि त्यांच्या मुलाविरूद्ध लैंगिक छळाच्या आरोपाखाली पोलिसांनी बुधवारी एफआयआर नोंदविला. त्यांच्यावर मेरठच्या सदर बाजार पोलिस ठाण्यात भादंवि कलम 354 (a) (लैंगिक छळ), 354 (c) (व्हॉयॉरिझम) आणि 504 (हेतुपुरस्सर अपमान) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. जेव्हा जेव्हा आपण पगारासाठी आवाज उठविला आणि प्रलंबित वेतनाची मागणी केली, तेव्हा तेव्हा हा सचिव आपल्याला सीसीटीव्हीमध्ये कैद केलेल्या आक्षेपार्ह फुटेजची भीती दाखवून धमकी देत असल्याचा आरोप शिक्षिकांनी तक्रारीत केला आहे. (हेही वाचा: तामिळनाडूमध्ये पंतप्रधान किसान सन्मान निधीमध्ये कोट्यावधी रुपयांचा घोटाळा; 5.95 लाख खात्यांच्या तपासणीमध्ये 5.38 लाख लाभार्थी निघाले बनावट)

या सचिवाने मात्र त्याच्यावर केलेले आरोप नाकारले आहेत. याबाबत बोलताना तो म्हणाला, ‘लैंगिक छळाचे आरोप पूर्णपणे खोटे आहेत. सध्याच्या परिस्थितीमुळे आम्ही गेल्या काही महिन्यांपासून वेतन देण्यास असमर्थ आहोत. महिलांच्या स्वच्छतागृहांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरा नाहीत, ते 'जेन्ट्स टॉयलेट्स'मध्ये बसविण्यात आले आहेत. काही शाळांमध्ये नुकत्याच घडलेल्या खून प्रकरणांच्या पार्श्वभूमीवर ते बसवण्यात आले आहेत,’ असे सेक्रेटरी म्हणाले. याआधी 2017 रोजी शाळेने विद्यार्थ्यांनी 'मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ हेअरकट' करण्यास सांगितले होते, त्यावेळीही ही शाळा चर्चेत आली होती.